Pune News : पुणेकर मुलीचे डच भाषेत पाठ्यपुस्तक | पुढारी

Pune News : पुणेकर मुलीचे डच भाषेत पाठ्यपुस्तक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : परकीय भाषांचे शिक्षण उपलब्ध असल्यामुळे परकीय भाषा शिकणारे आपण अनेकजण पाहतो. परंतु डच भाषा शिकवणारी कोणतीही संस्था नसताना केवळ गुगलच्या माध्यमातून भाषा शिकायची किमया साधली आहे पुण्याच्या रिचा गुजराथी कटारिया यांनी. रिचा यांनी डच भाषेत एक पाठ्यपुस्तक लिहिले असून, डच भाषा शिकवणारी संस्थादेखील सुरू केली आहे.
डच भाषेतील पाठ्यपुस्तक लिहिणार्‍या रिचा गुजराथी कटारिया या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत. तसेच, भारतीय व्यक्तीचे डच पुस्तक नेदरलँड्सच्या वाणिज्य दूतावासाने प्रकाशित केल्याचीही पहिलीच घटना आहे.

‘नेदरलँड्स व्हार किंडरिन’ असे या पुस्तकाचे नाव असून, स्टोरी मिरर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले. याप्रसंगी रिचा गुजराथी कटारिया यांच्यासह काउन्सिल जनरल बार्ट द याँग, डेप्युटी काउन्सिल जनरल थिरी व्हॅन हेल्डन, स्टोरी मिररचे सहसंस्थापक हितेश जैन तसेच गुजराथी व कटारिया कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

रिचा म्हणाल्या, काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशातून मी डच भाषा शिकण्याचे ठरवले. पण, ही भाषा शिकण्यासाठी पुरेसे शिक्षक किंवा पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यामुळे सुरुवातीला खूप अडचणी आल्या. आपल्याला डच भाषा शिकताना ज्या अडचणी आल्या, त्या इतरांना येऊ नयेत, या उद्देशातून या पुस्तकाची कल्पना सुचली.

त्यातून हे पाठ्यपुस्तक आकारास आले. त्यामुळे आता व्यवस्थापन संस्था, महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये डच भाषा शिकवण्याचे काम सुरू करावे. त्यामध्ये या पुस्तकाचा वापर व्हावा, असे माझे स्वप्न आहे. या पुस्तकात डच भाषेची सर्व प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा

संगोपन : पालक मीटिंगचे महत्त्व ओळखा

Pune News : पालिकेकडून 13 हॉटेलच्या अनधिकृत शेडवर कारवाई

Onion News : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, दर 3,700 रुपयांच्या आत

Back to top button