Pune News : राज्यात यंदा प्रथमच मुद्रांक विभागाला तब्बल 21 हजार कोटींचा महसूल | पुढारी

Pune News : राज्यात यंदा प्रथमच मुद्रांक विभागाला तब्बल 21 हजार कोटींचा महसूल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांतून पहिल्या सहामाहीत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला सुमारे 21 हजार 392 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या दोन वर्षांची आकडेवारी पाहता यंदा पहिल्या सहामाहीत जास्त महसूल प्राप्त झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. चालू आर्थिक वर्षात नोंदणी विभागाला 45 हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याला महसूल मिळवून देण्यात वस्तू व सेवा करानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो.

जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, ऑनलाइन भाडेकरार, अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. राज्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, सिंचन प्रकल्प, विमानतळ, मेट्रो आदींबरोबर विविध विकासकामांचा समावेश आहे. या कामांसाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते.

शासनाकडे जमा होणारा हा महसूल विविध विकासकामांवर खर्च केला जाणार आहे. जमा होणार्‍या महसुलाच्या आकडेवारीवरूनच कोणत्या कामांसाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा, याचा निर्णय होत असतो. त्यामुळे नोंदणी विभागाकडे जमा होणार्‍या महसुलाकडे शासनाचे लक्ष असते. दरम्यान, सन 2021-22 या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत दहा लाख 44 हजार 301 दस्त नोंद होऊन 11 हजार 10 कोटी 27 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

त्यानंतर सन 2022-23 या आर्थिक वर्षात 12 लाख 85 हजार 722 दस्त नोंद होऊन 18 हजार 324 कोटी एक लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांत 13 लाख 29 हजार 802 दस्त नोंद होऊन 21 हजार 392 कोटी 61 लाख रुपयांचा महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला प्राप्त झाला आहे.

हेही वाचा

पुणे : तरुणाईच्या सहभागात शांततेचा संदेश

घृणास्पद ! दहा वर्षांच्या मुलीशी 42 वर्षांच्या पोलिसाचे अश्लील चाळे

निपाणीतील युवकाचे अपहरण करून खून; भुदरगड तालुक्‍यातील किल्‍ला पायथ्‍याशी आढळला मृतदेह

Back to top button