शिरूरमधील पाणी समस्या गंभीर ; आजपर्यंतच्या अक्षम्य दुर्लक्षाने नागरिक हैराण | पुढारी

शिरूरमधील पाणी समस्या गंभीर ; आजपर्यंतच्या अक्षम्य दुर्लक्षाने नागरिक हैराण

अभिजित आंबेकर

शिरूर : शिरूर शहरात काही वर्षांपासून यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. असे किती दिवस सहन करायचे? असा संतप्त सवाल विचारत नागरिकांची या समस्येतून सुटका होणार की नाही? असा प्रश्न केला आहे. शिरूर शहर घोड नदीकाठावर वसलेले आहे. 90 च्या दशकाच्या आधी शहराची लोकसंख्या मर्यादित होती. मात्र, त्या वेळीही शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागायचे. शहरात आजूबाजूच्या विहिरींवरून अनेक नागरिक हंड्याने पाणी आणायचे. घोड नदीवर कुठेही पाणी अडविण्याची व्यवस्था नव्हती. अनेक हंडा मोर्चे त्या वेळी निघाले. याची दखल घेत तत्कालीन उपनराध्यक्ष नेमीचंद फुलफगर यांनी 1995 मधील शिवसेना-भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी व पालकमंत्री शशिकांत सुतार यांना भेटून पाठपुरावा करून शिरूर शहरासाठी घोड नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आणि शहराचा पाणी प्रश्न सुटला.

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नंतरच्या काळात पाणी शुध्दीकरण योजना कार्यान्वित झाली. 2001 नंतर औद्योगिकीकरणामुळे शिरूरचा विकास होऊ लागल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत दुप्पट झाली. मात्र, पाणीपुरवठा योजना जुनीच राहिली. शहराला लागणार्‍या पाणीपुरवठ्यात मात्र वाढ होऊ लागली. या काळात विविध नेत्यांनी नगरपरिषदेत सत्ता भोगली. त्यांनी या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहिले नाही. तीस वर्षांपूर्वी झालेल्या पाणीपुरवठा योजनेला इतक्या वर्षात काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे होता.

आज बंधार्‍यात पाणी असले, तरी वारंवार वीज नसणे, जलवाहिनी फुटणे, व्हॉल्व नादुरुस्त, अशा अनेक कारणांनी शहराचा पाणीपुरवठा बंद होत असतो. या जुन्या पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पण, त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. पाणीपुरवठा योजनेतील हत्ती डोह पंपिंग स्टेशनला जर बिघाड झाला, तर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन अनेक दिवस पाणीपुरवठा खंडित होतो. त्यासाठी एकही तज्ज्ञ कर्मचारी नगरपालिकेकडे नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून प्लंबरपद रिक्त आहे. थोडासा वारा किंवा पाऊस आला, वीजपुरवठा खंडीत झाला; तरी दुसर्‍या दिवशी शहराला पाणीपुरवठा होत नाही, अशी दयनीय अवस्था आहे.

हत्तीडोह पंपिंग स्टेशनपासून दहा ते बारा वर्षांपूर्वी एक्स्प्रेस फीडर तीन किमी जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत घेतला गेला. मात्र, त्या तारा जीर्ण झाल्या असून, त्याची देखभाल दुरुस्ती वीज वितरण कंपनीकडे असल्याने त्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित होतो, असे म्हणत नगरपालिकेने आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. प्रत्यक्षात एवढ्या वर्षांत काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे होते. वारंवार बिघाड होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे होते. मात्र, ते काही झाले नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर शहराला अशुध्द पाणीपुरवठा होत आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याने बहुतांश नागरिक पाण्याचा जार विकत घेत आहेत. दिवसा आठ जार जरी म्हटले तरी पाचशे रुपये महिना, वर्षाला सहा हजार रुपये व पाणीपट्टी मिळून साठेआठ हजार रुपये नागरिकांचे वर्षाला जात आहेत. पाण्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर नगरपालिका व राज्यकर्ते कसे असंवेदनशील असू शकतात, याचे शिरूर हे उत्तम उदाहरण आहे

राज्यकर्ते जबाबदार
सध्या प्रशासकीय राजवट आहे, असे सांगून शहरावर वर्षानुवर्षे सत्ता गाजविणारे तसेच विद्यमान आमदार हे आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. सध्याच्या प्रशासकीय काळातील केवळ ही समस्या नाही, तर गेली अनेक वर्षे सत्तेवर असलेल्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाचे हे कटू फळ आहे, अशी भावना शिरूरकर व्यक्त करीत आहेत.

शिरूर नगरपरिषदेने एक्स्प्रेस फीडर सुस्थितीत का केला नाही? धोरणात्मक निर्णय नगरपालिकेने घेतला नसल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. जलवाहिनी गळती झाल्यानंतर ही गळती काढण्यासाठी अनेक दिवस लागतात. गळती काढण्यासाठी लागणारे साहित्यसुध्दा नगरपालिकेकडे नसते.
                                     अनिल बांडे अध्यक्ष, शिरूर शहर प्रवासी संघटना

शिरूर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. शिरूर नगरपालिका प्रशासन व स्थानिक आमदारांचे शहरातील 40 हजार मतदार व अन्य एक लाख नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे. शिरूर भाजपच्या वतीने एक महिन्यापासून मी स्वतः शहरातील हापसे (हँडपंप) दुरुस्ती व्हावेत, यासाठी हेलपाटे मारत आहे. पण, प्रशासन कोणाच्या सांगण्यावरून नागरिकांची मजा घेत आहे. बंधार्‍यात पुरेसा पाणीसाठा आहे. शहरात साठच्या आसपास हापसे असूनदेखील नियोजनाअभावी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
                                                    विजय नर्के सरचिटणीस, शिरूर शहर भाजप

Back to top button