पुणे : चार दिवसांत तडजोडीचे 874 खटले निकाली | पुढारी

पुणे : चार दिवसांत तडजोडीचे 874 खटले निकाली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वाहनांवरील प्रलंबित दंड भरण्यासाठी येरवडा कार्यालयात पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्प डेस्क उभारण्यात आला आहे. या ठिकाणी वाहनावरील दंड कमी करण्यासाठी पुणेकर वाहनचालकांची गर्दी होत असून, सोमवारपासून (दि.28) अवघ्या चार दिवसांतच 874 तडजोडीचे खटले निकाली काढण्यात आले आहेत. त्याद्वारे 20 लाख रुपये दंडाची रक्कम जमा झाली आहे. हेल्मेट नसणे, सीट बेल्ट नसणे, ओव्हर स्पिड, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, यांसारखे लाखोंचे ऑनलाइन दंड पुणेकरांच्या वाहनांवर प्रलंबित आहेत.

हे दंड पुणेकर वाहनचालकांना भरण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून मदत केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी पुणेकर वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यासोबतच त्यांच्याकडून दंडाची रक्कम म्हणजेच तडजोडीने निम्मे केलेले शुल्कदेखील घेतले जात आहे. लोकअदालतीमध्ये खटला चालवून ही रक्कम तडजोडीने निश्चित केली जात असून, याकरिता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पुणेकरांना त्यांच्या वाहनांवरील दंडाची रक्कम सोयीस्कररित्या भरता यावी, याकरिता पुणे शहर वाहतूक शाखेकडून येरवडा येथील कार्यालयात हेल्प डेस्क उभारला आहे. येथे तडजोड करून पुणेकरांना दंड भरता येईल. या सेवेचा पुणेकरांनी लाभ घ्यावा.

Back to top button