पिंपरी : प्रसूतीदरम्यान माता मृत्यूच्या प्रमाणात घट; पावणेपाच वर्षांत फक्त 51 मृत्यू | पुढारी

पिंपरी : प्रसूतीदरम्यान माता मृत्यूच्या प्रमाणात घट; पावणेपाच वर्षांत फक्त 51 मृत्यू

पिंपरी(पुणे) : शहरात प्रसूतीदरम्यान होणार्‍या माता मृत्यूच्या प्रमाणात गेल्या पावणेपाच वर्षांत कमालीची घट झाली आहे. या कालावधीत केवळ 51 मातांचे प्रसूतीदरम्यान मृत्यू झाले. तर, गेल्या सव्वाचार वर्षांत 1 लाख 34 हजार 91 महिलांची प्रसूती झाली आहे. शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये वाढलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे माता मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिलासाजनक चित्र पाहण्यास मिळत आहे. प्रसूतीदरम्यान मातांचे होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब मानली जाते. बाळाला जन्म देऊन मातेचा होणारा मृत्यू हा पित्यासाठी एक मोठा धक्काच ठरतो. त्यामुळे त्या कुटूंबाला मानसिक आघात पोहोचतो. बाळाला मातेच्या प्रेमापासून वंचित राहावे लागते. पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या पाच वर्षांची आकडेवारी महापालिका वैद्यकीय विभागाकडून घेतली असता माता मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.

माता मृत्यूचे प्रमाण नगण्यच

आर्थिक वर्ष 2019-20 पासून जुलै 2023 अखेर गेल्या सव्वाचार वर्षांमध्ये एकूण 1 लाख 34 हजार 91 मातांची महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूती झाली. दरम्यान, कॅलेंडर वर्ष 2019 पासून जुलै 2023 अखेर गेल्या पावणेपाच वर्षात एकूण 51 मातांचा मृत्यू झाला आहे. महिलांच्या प्रसूतीच्या तुलनेत टक्केवारीत हे प्रमाण 0.038 टक्के इतके नगण्य आहे.

रुग्णालयांतील वैद्यकीय सुविधा वाढल्या

शहरामध्ये महापालिकेची नवीन पाच रुग्णालये सुरू झाली आहेत. त्यामध्ये नवीन भोसरी रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन आकुर्डी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (चिंचवड) आणि नवीन जिजामाता रुग्णालय आदींचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, शहरात विविध नामांकित खासगी रुग्णालये आहेत. त्यामध्येदेखील उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून प्रसूतीदरम्यान मातांचे होणारे मृत्यू कमी झाले आहेत.
महिलांची प्रसूती, माता मृत्यूचे प्रमाण 
आर्थिक वर्ष महिलांची प्रसूती माता मृत्यू
(कॅलेंडर वर्षनिहाय)
2019-20 32758 11 (वर्ष 2019)
2020-21 28373 13 (वर्ष 2020)
2021-22 30136 8 (वर्ष 2021)
2022-23 33508 10 (वर्ष 2022)
2023-24 9316 9  (वर्ष 2023)
(जुलै 2023 अखेर) एकूण 134091 51
हेही वाचा 

Back to top button