पिंपरी : डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्लेटलेट्सला मागणी | पुढारी

पिंपरी : डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्लेटलेट्सला मागणी

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये सध्या डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूची आत्तापर्यंत 73 जणांना लागण झालेली आहे. डेंग्यू आजाराची लागण होणार्‍या काही रुग्णांमध्ये प्लेटलेट्स (रक्तातील रक्तबिंबिका) झपाट्याने कमी होत असल्याचा अनुभव आहे. सामान्य रुग्णांमध्ये या प्लेटलेट्स 50 हजारांपर्यंत कमी होतात.

तर, काही गंभीर रुग्णांमध्ये या प्लेटलेट्सचे प्रमाण थेट पाच हजार प्लेटलेट्सपर्यंतदेखील कमी होऊ शकते. ही अतिशय धोकादायक स्थिती असते. त्यामध्ये रुग्णाचा रक्तस्त्राव नवीन प्लेटलेट्स दिल्याशिवाय थांबत नाही, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. त्यामुळे डेंग्यू आजाराची लागण झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण योग्य आहे का, याची तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. प्लेटलेट्सची कमतरता असल्यास रक्तपेढ्यांतून तातडीने प्लेटलेट्स घेऊन ही कमतरता भरुन काढायला हवी.

दोन महिन्यांत वाढली रुग्णसंख्या

शहरामध्ये जुलै महिन्यात डेंग्यूचे 36 बाधित रुग्ण आढळले. तर, ऑगस्ट महिन्यात 23 तारखेपर्यंत 37 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महिलांच्या तुलनेत डेंग्यूची लागण झालेल्या पुरुष रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. 44 पुरुष तर, 29 महिला रुग्णांना गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे एकूण 73 रुग्णांपैकी 21 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक 19 रुग्णांना डेग्यूंची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रक्तपेढ्यांमध्ये वाढली प्लेटलेट्सची मागणी

शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीत दोन महिन्यांपूर्वी केवळ 4 ते 10 बॅग्ज इतक्याच प्लेटलेटसची मागणी होती. मात्र, सध्या येथे दररोज 25 ते 30 बॅग इतकी प्लेटलेट्सची मागणी नोंदविली जात आहे.

डेंग्यू या आजाराने बाधित रुग्णाच्या शरीरात डेंग्यूचे विषाणू हल्ला करून प्लेटलेट्स नष्ट करतात. शरीरातील बोन मॅरो (अस्थि मज्जा) यंत्रणा संथ गतीने काम करू लागते. पर्यायाने, नवीन प्लेटलेट्स कमी तयार होतात. तसेच, आहे त्या प्लेटलेट्सदेखील नष्ट होऊ लागतात. सामान्य रुग्णांमध्ये 50 हजारांपर्यंत तर गंभीर रुग्णांमध्ये पाच हजारांपर्यंतदेखील प्लेटलेट्स खाली येतात.

– डॉ. राजेंद्र बावळे, अधिष्ठाता,
वायसीएम रुग्णालय आणि पदव्युत्तर संस्था

डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने सध्या प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. दिवसाला 25 ते 30 बॅग इतकी मागणी आहे. महापालिकेच्या रक्तपेढीमध्ये सध्या रक्ताचा पुरेसा साठा आहे. रक्ताच्या 800 बॅग उपलब्ध आहेत.

– डॉ. शंकर मोसलगी, रक्तसंक्रमण अधिकारी,
वायसीएम रुग्णालय रक्तपेढी.

शरीरात किती प्लेटलेट्सची गरज

व्यक्तीच्या शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण एका निश्चित मर्यादेत असणे गरजेचे आहे. प्लेटलेट्स आपल्या शरीरातील रक्ताच्या गठुळ्या तयार करण्याचे काम करतात. जेणेकरून दुखापत झाल्यास अतिरिक्त रक्त बाहेर येण्यापासून रोखता येते. प्लेटलेट्स या रंगहीन रक्तपेशी असतात. ज्या रक्त गोठण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट्सची श्रेणी प्रतिमायक्रोलिटर दीड ते साडेचार लाख इतकी असते. प्लेटलेट्सची संख्या प्रतिमायक्रोलिटर दीड लाखाच्या खाली येते तेव्हा त्याला कमी प्लेटलेट्स म्हणतात.

हेही वाचा

विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या महिलेस अखेर मिळाली आर्थिक भरपाई

नागपूर : विरोधी पक्षनेत्यांची काँग्रेसमधील शेवटची निवडणूक : सुधीर मुनगंटीवार

वाढत्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी टाटाच्या धरणातून पाणी घ्यावे लागेल

Back to top button