पुणे : भाटघर धरणात पर्यटनासाठी आलेल्या मुलीचा बुडून मृत्यू; वडील बेपत्ता | पुढारी

पुणे : भाटघर धरणात पर्यटनासाठी आलेल्या मुलीचा बुडून मृत्यू; वडील बेपत्ता

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्याच्या भाटघर धरण बॅक वॉटरच्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड (ता.भोर) येथे पर्यटनासाठी आलेले बाप-लेक बुडाल्याची घटना घडली. ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय 13 वर्षे) व शिरीष मनोहर धर्माधिकारी अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यापैकी मुलगी ऐश्वर्या हिचा मृतदेह मिळाला तर वडिल शिरीष हे बेपत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय 45 वर्षे रा. औंध, पुणे) हे आपल्या कुटुंबियांसह जयपाड (ता. भोर) येथे आज (दि. १५) पर्यटनासाठी आलेले होते. त्यांच्यासोबत अन्य काही लोकही होते. हे सर्वजण दुपारी ४ च्या सुमारास सिमा फार्म पाठीमागे असणा-या भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी गेले. यावेळी शिरीष हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांची मुलगी ऐश्वर्या हिला देखील त्यांनी बोलावून घेतले. दरम्यान दोघेही पाच ते सहा मिनिट खोल पाण्यात पोहत असताना बुडाले. यावेळी उपस्थित काहींनी या दोघांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरु केले. यावेळी ऐश्वर्याला पाण्याबाहेर काढले तेव्हा ती बेशुध्द पडलेली होती. त्यांनतर तिला सरकारी दवाखाना भोर येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ऐश्वर्या तिला मयत घोषीत केले. तसेच शिरीष मनोहर धर्माधिकारी हे पाण्यात बुडालेले असुन ते अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही. या घटनेचा अधिक तपास भोर पोलीस करत आहेत.

Back to top button