खचलेल्या साइडपट्टीमुळे शिरूर-नारायणगाव रस्त्यावर अपघात | पुढारी

खचलेल्या साइडपट्टीमुळे शिरूर-नारायणगाव रस्त्यावर अपघात

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  समोरून येणार्‍या वाहनाला रस्ता देत असताना खचलेल्या साइडपट्टीमुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने दूध वाहतूक करणारे वाहन रस्त्याच्या कडेला असणार्‍या खड्ड्यात कोसळले. ही घटना सोमवारी (दि. 7) शिरूर -नारायणगाव रस्त्यावर घडली. शिरूर ते नारायणगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार्‍या या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनही जांबूत ते काठापूर खुर्द या हद्दीतील मार्ग दुर्लक्षित राहिला आहे. नुकताच शिरूर-नारायणगाव या रस्त्याच्या काही भागाला पुरवणी अर्थसंकल्पातून सुमारे 54 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. यामध्ये शिक्रापूर – गणेगाव खालसा – मलठण – टाकळी हाजी – जांबूतपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाला सुमारे 5 कोटी 50 लाखांचा निधी टाकण्यात आला आहे.

जांबूत ते पिंपरखेड, काठापूर खुर्द या रस्त्याचा भाग दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्याच्या साइडपट्ट्या न भरल्याने अनेक छोटमोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांची पाहणी करून साइडपट्ट्या भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राहिलेल्या मार्गाचे डांबरीकरण आणि रुंदीकरणासाठी वाढीव निधीची तरतूद करून जांबूत- पिंपरखेड- काठापूर खुर्द हा रस्ता अष्टविनायक महामार्गाला जोडल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून अधिकचा निधी या भागात वितइरत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करीत आहे. जांबूत, पिंपरखेड, काठापूर खुर्द या भागातील प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी आवश्यक निधी टाकून सदरचे रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येणार आहे.
                – प्रदीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, भीमाशंकर साखर कारखाना

Back to top button