चिमुरड्यांनाही लागतोय चष्मा; वेळीच व्हा सावध..! | पुढारी

चिमुरड्यांनाही लागतोय चष्मा; वेळीच व्हा सावध..!

पिंपरी : तुमची मुले जास्त मोबाईल किंवा टीव्ही पाहत असतील तर वेळीच सावध व्हा. दहा वर्ष वयोगटाच्या आतील चिमुरड्यांनाही आता चष्मा लागतो आहे. चष्मा लागण्याचे कारण अनुवंशिक असल्याचे डॉक्टर सांगत असले तरीही मुलांना चष्मा आहे का, हे तपासून वेळीच चष्मा लावलेला बरा. तसेच, मोबाईल आणि टीव्हीच्या जास्त आहारी मुलांना जाऊ देऊ नका, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.

..तर चष्म्याचा नंबर वाढू शकतो ?
चष्मा लागण्याचे प्रमुख कारण हे अनुवंशिकता आहे. चष्मा जर पालकांना लागलेला असेल तर मुलांनाही लागू शकतो. मुलांना चष्म्याचा नंबर लागला असेल आणि त्याचा वापर केला नाही तर डोळ्यांची नजर कमजोर होते. मोबाईलचा अतिवापर, सतत टीव्ही, लॅपटॉप पाहणे यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. डोळ्यांतील कोरडेपणा वाढतो. पर्यायाने, चष्म्याचा नंबर वाढू शकतो. त्यामुळे मुले बोलायला लागली की त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. रुपाली महेशगौरी यांनी सांगितले.

मुलांना चष्मा लागला आहे, हे स्वीकारा
मुलांना चष्मा लागला की बर्याचदा पालकांची प्रतिक्रिया अशी असते की, अरे, तुला चष्मा लागला ? त्यामुळे मुलांना चष्मा लागला म्हणजे काही तरी मोठे अघटित घडले, अशी धारणा निर्माण होते. तरी, पालकांनी मुलांना चष्मा लागला म्हणून त्यांना निरुत्साही करण्यापेक्षा त्यांना प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढवायला हवा.

दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना चष्मा
महापालिका शाळांतील सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 1 हजार 700 विद्यार्थ्यांना चष्मा लागला आहे.

डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?
सकाळी उठल्यानंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.
चष्म्याचा नियमित वापर करावा.
पाणी भरपूर प्यावे. डोळ्यांचा व्यायाम करावा.
अ जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा.
हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबा, केळी, गाजर, शेवग्याच्या शेंगा यांचा आहारात समावेश करावा.

चष्मा लागण्यामागे प्रामुख्याने अनुवंशिक कारण असते. मात्र, मोबाईल, लॅपटॉपचा अतिवापर यामुळे चष्म्याचा नंबर वाढू शकतो. दहा वर्ष वयोगटानंतर एकदा चष्मा लावल्यावर अपेक्षित नजर सुधारत नाही. पॉझिटिव्ह नंबर असल्यास तो कमी-कमी होत जातो. निगेटिव्ह नंबर हळूहळू वाढत जातो. मुलांना चष्मा लागला असल्यास पालकांनी ही गोष्ट स्वीकारावी. मुलांना निरुत्साही न करता प्रोत्साहन द्यावे.
– डॉ. रुपाली महेशगौरी,नेत्ररोग विभाग प्रमुख, नेत्र रुग्णालय, मासुळकर कॉलनी.

हेही वाचा :

पिंपरी : वायसीएमच्या नवीन शवागारातील शीतगृह अर्धवट

पिंपरी : पीएमआरडीए क्षेत्रात घर बांधणी, कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नागरिकांची दमछाक

Back to top button