निरा खोर्‍यातील चारही धरणांत 64.62 टक्के पाणीसाठा | पुढारी

निरा खोर्‍यातील चारही धरणांत 64.62 टक्के पाणीसाठा

निरा : पुढारी वृत्तसेवा :  निरा खोर्‍यात गेल्या आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू असल्याने निरा देवघर, भाटघर, गुंजवणी तसेच वीर धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. बुधवारी ( दि. 26) संध्याकाळी चार वाजता निरा खोर्‍यातील या चारही धरणांत सुमारे 64.62 टक्केपाणी साठा झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी निरा खोर्‍यात पावसाने उशिरा सुरुवात केल्याने निरा देवघर वगळता तीनही धरणे गेल्या वर्षीपेक्षा कमी भरलेली आहेत. गेल्या आठ- दहा दिवसांपासून निरा देवघर,भाटघर, गुंजवणी धरणांच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. वीर धरणाच्या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरी निरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी वीर धरणात येत असल्याने वीर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

बुधवारी (दि. 26) संध्याकाळी चार वाजता निरा देवघर धरणात 8.869 टीएमसी पाणीसाठा होता, तर गतवर्षी या दिवशी 7.577 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. भाटघर धरणात 13.954 टीएमसी पाणीसाठा, तर गतवर्षी 16.813 टीएमसी पाणीसाठा होता. गुंजवणी धरणात 2.288 टीएमसी पाणीसाठा होता, तर गतवर्षी या दिवशी 3.118 टीएमसी पाणीसाठा होता.

वीर धरणात बुधवारी (दि. 26) संध्याकाळी चार वाजता 6.323 टीएमसी पाणी साठा उपलब्ध होता, तर गतवर्षी या दिवशी 9.204 टीएमसी पाणीसाठा होऊन वीर धरण 97.83 टक्के भरून 100 टक्के भरण्याच्या मार्गावर होते. यंदा वीर धरण परिसरात अत्यल्प पाऊस असल्याने निरा देवघर, भाटघर व गुंजवणीच्या पाण्यावरच वीर धरण भरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

निरा खोर्‍यातील निरा देवघर, भाटघर, गुंजवणी , वीर धरणांत बुधवारी ( दि. 26) संध्याकाळी चार वाजता 31.234 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, तर गतवर्षी या दिवशी चारही धरणांत 36.712 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणजेच गतवर्षापेक्षा निरा खोर्‍यात यंदा उशिरा पावसाने सुरुवात केलेली असली तरी सध्या तरी शेतकर्‍यांची चिंता मिटल्याचे दिसू लागले आहे. दरम्यान, वीर धरणाच्या निरा उजव्या कालव्यातून लाभधारकांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता व सिंचनाकरिता 600 क्युसेक्सने आर्वतन सोडण्यात आल्याचे वीर धरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण घोरपडे यांनी सांगितले.ें

वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्यातून सिंचनाकरिता व पिण्याच्या पाण्याकरिता 827 क्युसेक्सने आवर्तन सोडण्यात आले आहे.
            -योगेश भंडलकर, सहायक अभियंता, निरा जलसंपदा उपविभाग 

 

हेही वाचा :

मणिपूरसंदर्भातील याचिका सरन्यायाधीशांसमोर दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्यांसाठी पीक स्पर्धा

Back to top button