यंदा 50 संस्थांमध्ये नवे शिक्षण धोरण  | पुढारी

यंदा 50 संस्थांमध्ये नवे शिक्षण धोरण 

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील 50 शैक्षणिक संस्था आणि तंत्रशिक्षणच्या तीन विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण यंदापासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली. डॉ. मोहितकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्य व ज्ञानप्राप्ती आणि विज्ञान, तंत्रज्ञान शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रामधील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी भारतातील लोकसंख्येला गुणवत्तापूर्ण शिक्षण, नावीन्यपूर्ण शिक्षण व संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे.

महाराष्ट्र राज्याने ते अंगीकारले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय शिक्षण प्रणालीचा अंतर्भाव करण्यात आला असून, ज्याचा उद्देश मानवाच्या सर्व क्षमतांचा नैतिक एकालिक पद्धतीने विकास करणे आहे. नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्याने शैक्षणिक वर्ष 2023- 24 पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तंत्रशिक्षण संचालनालयाशी संलग्न असलेल्या 50 शैक्षणिक संस्था तसेच तीन विद्यापीठांमध्ये नवीन धोरणानुसार अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

या विद्यापीठांचा समावेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल
टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ

Back to top button