शेतकर्‍याला विमा नाकारला; कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका | पुढारी

शेतकर्‍याला विमा नाकारला; कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वयाचे कारण देऊन शेतकर्‍याचा विम्याचा दावा नाकारणार्‍या विमा कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. अपघात विम्याचे 2 लाख रुपये 21 फेब्रुवारी 2018 पासून वार्षिक 7 टक्के व्याजाने देण्याचा आदेश आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला. तसेच, नुकसानभरपाईपोटी 20 हजार, तक्रारीच्या खर्चापोटी 5 हजार रुपये द्यावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

याबाबत नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील होरपळी येथील शेतकर्‍याने अ‍ॅड. हानवते यांच्यामार्फत ओरिएंटल इन्श्यूरन्स कंपनीविरुद्ध आयोगात दावा दाखल केला होता. तक्रारदारांची आई या शेतकरी होत्या. 3 जुलै 2017 रोजी बैलाचा दोर सोडण्यासाठी त्या गेल्या असता बैलाने त्यांच्या पोटात शिंग मारले. पोटात जखम झाल्याने उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित पोलिस स्टेशनमध्ये खबर नोंदविण्यात आली. तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रांसह विम्याच्या रकमेसाठी दावा दाखल केला. मात्र, तक्रारदार यांच्या आईचे वय 75 पेक्षा अधिक असल्याचे कारण देत विमा कंपनीने 21 फेब्रुवारी 2018 रोजी दावा नामंजूर केला. तक्रारदारांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी विमा कंपनीला नोटीस पाठविली. त्यानंतरदेखील कंपनीने दावा दाखल न केल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेत दावा दाखल केला. विम्याचे 2 लाख 15 टक्के वार्षिक व्याजाने, नुकसानभरपाईपोटी 20 हजार, तक्रारीच्या खर्चापोटी 5 हजार द्यावे, अशी मागणी केली.

याबाबत विमा कंपनीने लेखी जबाबाद्वारे विमा हा ज्या शेतकर्‍याचे वय अपघातावेळी 10 ते 75 वर्षांपर्यंत असेल अशा शेतकर्‍यांसाठीच लागू होतो. तक्रारदारांच्या आईचे वय हे अपघातावेळी 77 वर्षे होते. त्यामुळे पॉलिसीच्या अटी-शर्तीनुसार हा क्लेम नाकारण्यात आला आहे, असे नमूद केले. दरम्यान, याप्रकरणी आयोगापुढे सादर झालेली कागदपत्रे, शपथपत्रे, लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन करून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत आयोगाने विम्याची रक्कम व्याजासह देण्याचा आदेश दिला.

हे ही वाचा :

राज्यातील विकास सोसायट्या ऑनलाईन होणार

पुणे : स्कूल बस नियमावलीचे पालन करा ; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे निर्देश

Back to top button