मंत्र्यांचा पाहुणा थेट ’महसूल’मध्ये ; चक्क यंत्रणाच घेतली ताब्यात | पुढारी

मंत्र्यांचा पाहुणा थेट ’महसूल’मध्ये ; चक्क यंत्रणाच घेतली ताब्यात

सीताराम लांडगे :

लोणी काळभोर : राज्यातील एका मंत्र्याच्या नाजूक नात्याचा फायदा घेऊन एका पाहुण्या दलालाने पुण्याची सर्व महसूल यंत्रणाच ताब्यात घेतली असून, अनेकांना सरकारी कार्यालयाऐवजी या दलालाचा मुक्काम असलेल्या पंचतारांकित हॉटेलातच कामासंबंधी आदेश घेण्यासाठी जावे लागत आहे. मंत्र्याच्या नावाचा वापर करून महसूल प्रशासनावर दबावतंत्राचा प्रयत्न या दलालाच्या टोळक्याकडून सुरू आहे. बडा दलाल असलेला सरकारी पाहुण्याचा राबता महसूलमध्ये वाढला आहे. सातारच्या या दलालाचे ‘तेंडुलकर स्टाईलने शिंदेशाही षटकार’ मारण्याचे काम सुरू असल्याने यांच्याकडे महसूलमधील इतर किरकोळ दलालांचा गोतावळा वाढला आहे. जिल्ह्यातील दलालांचा टोळीप्रमुख म्हणून या सरकारी पाहुण्याची ओळख निर्माण झाली आहे.

अधिकार्‍यांवर दबावतंत्र वापरून अर्धन्यायिक प्रकरणात हस्तक्षेप सुरू असल्याने अधिकारीही या दलाला वैतागले आहेत. परंतु, ‘सांगताही येईना आणि सहनही होईना’ अशी त्यांची अवस्था आहे. दावा हरकती केस प्रक्रियेत हस्तक्षेप करून नोटिसा काढण्यात दबावतंत्र, सुनावणी घेण्यासाठी हस्तक्षेप, निकाल देण्यासाठी दबाव, हा सरकारी पाहुणा सांगेल तोच निकाल दिला पाहिजे, असा आग्रह असल्याने अधिकार्‍यांसह नागरिकही पुरते हैराण झाले आहेत. या दलालाचा पुणे जिल्ह्यात मोठा बोलबाला आहे. या दलालाचे नुसते नाव सांगितले, तरीही सर्व कामे बाजूला ठेवून त्याचे काम करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

हा बडा दलाल वेळप्रसंगी अधिकार्‍यांच्या अँडी चेंबरमध्ये तळ ठोकून बसतो, तर शासकीय वाहनातून शहरात ग्रामीण भागात याचे फिरणेही सुरू आहे. जिल्ह्यातील एका मलईदार कार्यालयात तर ‘तो सांगेल तेच धोरण आणि तेच तोरण’ असल्याची चर्चा ‘महसूल’मध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. या दलालाचे एवढे मोठे धाडस, की एका मंत्र्याच्या मुलाची फाइलसुद्धा रद्द करण्याची करामत त्याने करून दाखविल्याची चर्चा आहे. कर्मचारी व अधिकार्‍यांच्या बदल्यांतसुद्धा मोठा हस्तक्षेप असल्याची चर्चा ‘महसूल’मध्ये आहे.

गैरफायदा घेत दबाव
सध्या पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात बदल्या होऊन नवीन पदभार घेतलेल्या नवख्या अधिकार्‍यांवर दबावतंत्र वापरून छाप पाडण्यात हा दलाल यशस्वी झाला आहे. या दलालाचा वाढता हस्तक्षेप हा एप्रिल महिन्यापासून सुरू आहे. याच्या तक्रारी खूप असतानाही कोणताही अधिकारी मंत्र्याकडे तक्रार करण्याचे धाडस करीत नसल्याने याचाच गैरफायदा घेत महसूल विभागात दबावतंत्राचा वापर करीत असल्याची चर्चा ‘महसूल’मध्ये आहे.

हेही वाचा :

सातारा : शाळकरी मुलाचे कोयत्याने बोट छाटले

आर्थिक विकासाला ‘बाजारा’ची सलामी

Back to top button