पुणे : शहरातील बेवारस वाहने उचलणार | पुढारी

पुणे : शहरातील बेवारस वाहने उचलणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणारी बंद अथवा बेवारस वाहने उचलण्याची कारवाई अनेक दिवस थांबल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या वाहनांवर नोटीस चिकटविण्यात येत असून, सात दिवसांनंतर ही वाहने जप्त केली जाणार आहेत. शहरात 15 वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार संबंधित वाहन मालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे.

ही वाहने स्क्रॅप करत नाहीत. ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. अशी असंख्य वाहने शहरातील लहान मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांनाही सहन करावा लागतो. दुसरीकडे या वाहनाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अतिक्रमण विभागाकडून अशी वाहने हलविण्यासाठी आरटीओच्या मदतीने वाहन मालकांना नोटीस बजावली जाते. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते. मात्र, काही महिन्यांपासून ही कारवाई बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. महापालिकेतर्फे पुन्हा बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

वाहन उचलण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयातर्फे संबंधित वाहनावर नोटीस चिकटविण्यात येईल. त्यानंतर सात दिवसांत वाहन न हटविल्यास ते जप्त केले जाईल. आतापर्यंत 22 वाहने जप्त केली असून, 18 वाहनांना नोटीस चिकटविली आहे. याशिवाय आपल्या परिसरातील बेवारस वाहनांची माहिती कळविण्यासाठी स्वतंत्र क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल.
                          – माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका 

हेही वाचा :

सातारा : शाळकरी मुलाचे कोयत्याने बोट छाटले

बेळगावचेही योगदान; चांद्रमोहिमेत बेळगावचे दोन अभियंते

 

Back to top button