chandrayaan 3 | बेळगावचेही योगदान : चांद्रमोहिमेत बेळगावचे दोन अभियंते

chandrayaan 3 | बेळगावचेही योगदान : चांद्रमोहिमेत बेळगावचे दोन अभियंते

बेळगाव; वासुदेव चौगुले, विठ्ठल कोळेकर : भारताची तिसरी चांद्रमोहीम यशस्वी होण्याच्या वाटेवर असताना या मोहिमेत बेळगाव जिल्ह्यातील दोन वैज्ञानिकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीमाभागासाठी ही अभिमानाची बाब आहे. खानापूर तालुक्यातील अनगडी गावचे प्रकाश पेडणेकर आणि निपाणी तालुक्यातील आडी गावचे के. ए. लोहार अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही 'इस्रो'च्या बंगळूर मुख्यालयात कार्यरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे दोघांचेही शिक्षण ग्रामीण भागात आणि मराठी माध्यमात झालेले आहे.

युवा वैज्ञानिक असलेले प्रकाश पेडणेकर यांनी चांद्रयान-2 मिशनमध्येही काम केले होते. चांद्रयान-3 च्या मिशनसाठी योगदानातील सातत्याच्या जोरावर त्यांनी आपले सहभागित्व निश्चित केले. एलव्हीएम-3 रॉकेट निर्मितीमध्ये काम करताना क्रायोजेनिक इंजिन आणि इंधनाच्या कमांड सिस्टीमवर त्यांनी काम केले आहे.

आडीचे सुपुत्र शास्त्रज्ञ के. ए. लोहार यांचाही या मोहिमेत विशेष सहभाग आहे. के. ए. लोहार हे गेली 28 वर्षे 'इस्रो'मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण आडी येथील प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शिक्षण सौंदलगा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. बेळगाव येथे डिप्लोमाचे शिक्षण तर बीई व एमटेकचे शिक्षण बंगळूर येथे पूर्ण केले. शुक्रवारी चांद्रयान-3 प्रक्षेपणासाठी अनेक शास्त्रज्ञ सहभागी होते. 'इस्रो'मध्ये गेली 28 वर्षे सेवा बजावत लोहार यांनी सीमाभागाचे नाव उज्ज्वल केले आहे. दोघांच्या योगदानामुळे देशासाठी तसेच अखिल मानव जातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या चांद्रमोहिमेत बेळगाव जिल्ह्याचाही वाटा असल्याचे सिद्ध झाले आहे.

'पुढारी'ने दोघांशीही संपर्क साधला असता, आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून त्यांनी मोहिमेच्या यशाची खात्री व्यक्त केली. देशासह सार्‍या जगाचे लक्ष या मोहिमेकडे आहे. त्या मोहिमेचा एक भाग बनता आले, याचा अभिमान आणि समाधान आहे, असे दोघांनीही सांगितले.

दोघांचेही शिक्षण मराठीतून

चांद्रमोहीमेत भाग घेतलेले पेडणेकर आणि लोहार या दोघांचेही शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे. पेडणेकर यांचे प्राथमिक शिक्षण अनगडीमध्ये तर माध्यमिक शिक्षण कापोली हायस्कूलमध्ये झाले आहे. पेडणेकर यांनी गेल्या वर्षी आपल्या हायस्कूलला भेट दिली होती.

बेळगावकरांचा मंगळ मोहिमेतही सहभाग

याआधीच्या भारताच्या मंगळ मोहिमेतही बेळगाववासीयांचा सहभाग राहिलेला आहे. मंगळयानाचे काही भाग बेळगावमधील कारखानदार दीपक धडोती यांच्या कारखान्यात बनले होते. यानासाठी लागणारे काही व्हॉल्व्ह धडोती यांनी बनवले होते. याशिवाय 'इस्रो'च्या प्रत्येक उपग्रह प्रक्षेपणातही या कंपनीचे योगदान असते.

पृथ्वीवरील काही चिन्हे चंद्रावर दिसतात का, त्यांचा अभ्यास, इतर ग्रह, उपग्रह आणि तार्‍यावर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे का, अशा अनेक प्रश्नांची उकल चांद्रयान-3 करेल. 14 ते 20 दिवसांमध्ये प्रज्ञान हे लँडर चंद्राच्या चोहीकडे आणि 360 अंशांत फिरत राहील. मोहिमेच्या सॅटेलाईट टीममध्ये सहभागी होता आले. अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञही सहभागी आहेत.
– के. ए. लोहार, वैज्ञानिक, 'इस्रो'

मोहीम फत्ते करायचीच, या जिद्दीने 'इस्रो'चे वैज्ञानिक झपाटून कामाला लागले होते. रॉकेट लॉचिंगसाठीच्या क्षेत्रात काम करण्याची मला संधी मिळाली. रॉकेटला लागणार्‍या इंधन आणि ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमांड सिस्टीमवर देखरेख ठेवण्याबरोबरच अतिशय क्लिष्ट समजल्या जाणार्‍या क्रायोजनिक स्टेजच्या निर्मितीची जबाबदारी पार पाडता आली.
– प्रकाश पेडणेकर, युवा वैज्ञानिक, 'इस्रो'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news