खंडाळा प्रशिक्षण केंद्र ‘बेस्ट’ ; मुख्यमंत्र्याच्या हस्ते पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा गौरव | पुढारी

खंडाळा प्रशिक्षण केंद्र ‘बेस्ट’ ; मुख्यमंत्र्याच्या हस्ते पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा गौरव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय गृहमंत्री यांचा ‘बेस्ट पोलिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन’ पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा यांना प्रदान करण्यात आला. या वेळी प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य तसेच सध्याचे परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांना गौरविण्यात आले. भारतातील पश्चिम प्रादेशिक विभागासाठी (महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दीव दमन ) 2020-21 या वर्षाचे ‘युनियन होम मिनिस्टर ट्रॉफी फॉर बेस्ट पोलिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या मुंबई येथील पोलिस मुख्यालयात खंडाळा प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य व पुणे शहर पोलिस उपआयुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात अराजपत्रित अधिकार्‍यांसाठी 2021-22 मध्ये अभ्यासक्रम, प्रशिक्षण, प्रशिक्षणाच्या सोयी सुविधा, पायाभूत सुविधा तसेच इतर अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वसतिगृहातील सोयी-सुविधांसह स्मृती संग्रहालय, प्रेरणा परिषद परिसंवाद कक्ष, गांडूळ व कंपोस्ट खत प्रकल्प, महिला प्रशिक्षणार्थींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, व्यायामशाळा, अभ्यासिका, करमणूक आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्राला पोलिस शिपायांच्या प्रशिक्षणाबाबत केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट पोलिस प्रशिक्षण पदक, पोलिस महासंचालक यांचा आदर्श प्रशिक्षक पुरस्कार मिळाला आहे; परंतु अराजपत्रित अधिका-यांसाठीच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. अपर पोलिस महासंचालक संजय कुमार आणि विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सेनगावकर यांचे यासाठी विशेष मार्गदर्शन लाभले.
                                          – शशिकांत बोराटे, पोलिस उपायुक्त परिमंडळ 4. 

हे ही वाचा :

पुणे : आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मध्यरात्री तृतीयपंथी समाजाचे जोरदार आंदोलन

पुणे : कोण होणार भाजपचा शहराध्यक्ष?

Back to top button