कंत्राटासाठी कुरुलकरची महिलेशीही लगट? | पुढारी

कंत्राटासाठी कुरुलकरची महिलेशीही लगट?

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पाकिस्तानी ललनाच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रदीप कुरुलकरचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. डीआरडीओचे कंत्राट मिळविण्यासाठी आलेल्या एका महिलेलाही त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केल्याचे तपासात समोर आले आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्या महिलेने कोणतीच तक्रार पोलिसांकडे दिली नसल्याचे समजते.

संरक्षण विभागाच्या डीआरडीओत (संरक्षण संशोधन व विकास संस्था) शास्त्रज्ञ आणि संचालक असलेला डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर याच्या देशविरोधी कृत्याचे कारनामे 3 मे 2023 रोजी बाहेर आले. त्याच्या अटकेनंतर 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. एटीएसने कुरुलकरविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात एक हजार 837 पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. कुरुलकरने पाकिस्तानी हेर असलेल्या झारा दासगुप्ता हिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या संवादाची प्रत दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकर याने झाराबरोबर अग्नी, ह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

कंत्राट अन् जवळीकता
संरक्षण दलाच्या डीआरडीओतील विविध कामांचे कंत्राट मिळावे म्हणून एका भारतीय महिलेशी देखील कुरुलकरने जवळीक साधल्याचा प्रकार एटीएसच्या दोषारोपपत्रात समोर आला आहे. वास्तविक, या महिलेने कुठलीही तक्रार पोलिसांकडे केलेली नाही. मात्र, तिने कुरुलकरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून साधलेला संवाद तपासात समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यास कुरुलकरच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असे तपास यंत्रणेस वाटते. तसे झाल्यास त्याच्याविरुद्ध कलम वाढवून नव्याने पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या पथकाने महिलेची चौकशीही केल्याचे समजते.

हे ही वाचा : 

आयटीआय प्रवेशाची यंदाही क्रेझ

Back to top button