पुणे : साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज | पुढारी

पुणे : साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जपानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसीस, शहरी भागात डेंग्यू अशा विविध आजारांच्या साथींचा प्रादूर्भाव होतो. जलजन्य आणि किटकजन्य आजाराच्या प्रभावी नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सर्व जिल्ह्यांना साथरोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेचा आढावाही घेण्यात येत आहे. साथरोग प्रतिबंध व नियंत्रणाचे काम नेमकेपणाने करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या भागातील जोखीमग्रस्त गावांची यादी तयार केली आहे.

सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे पंधरवडा सर्वेक्षण कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. दैनंदिन सर्वेक्षणासाठी करावयाच्या गृहभेटीच्या वेळी जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. जलजन्य आजारांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील जलस्त्रोतांची तपासणी करण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने स्त्रोताभोवतालची स्वच्छता आणि नळगळती दुरुस्ती अशी कामे युध्दपातळीवर करण्यात येत आहेत, अशी माहिती सहायक संचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.

या उपाययोजना करा…
परिसरात स्वच्छता करून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे अथवा वाहती करणे, जोखमीच्या भागात कीटकनाशक फवारणी, अळीनाशकांचा वापर डासांचे जैविक नियंत्रण करण्यासाठी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे.. वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाण्या, डासप्रतिरोधक क्रीम वापरणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे.

पावसाळ्यामध्ये उद्भवणा-या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध ठेवणे.
उपसंचालक, जिल्हा, तालुका, प्रा. आ. केंद्र स्तरावर शीघ्र  प्रतिसाद पथक कार्यान्वित करणे.
जिल्हा स्तर, विभागीय स्तर व राज्य स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना.
साथरोग सर्वेक्षण अधिक प्रभावीपणे होण्यासाठी गावपातळीवरील आशा कार्यकर्तींचा सहभाग.
साथरोग नियंत्रणासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, कृषी, नगरविकास आणि पशुसंवर्धन
अशा विविध विभागांशी नियमित समन्वय. विविध माध्यमांद्वारे जनतेचे साथरोगविषयक आरोग्य प्रशिक्षण.

 

Back to top button