पुणे : नियमांना पायदळी तुडवून कारखान्यांचा कारभार | पुढारी

पुणे : नियमांना पायदळी तुडवून कारखान्यांचा कारभार

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) : औद्योगिक क्षेत्र रासायनिक झोन असून, येथे जवळपास लहान-मोठ्या 200 रासायनिक कंपन्यांचे जाळे पसरले आहे. बहुतांश कारखाने शासनाच्या नियमांना पायदळी तुडवून कारभार करतात. याप्रकरणी मोजक्या कारखान्यावर कारवाई केली जात असून, नामांकित कारखान्याकडून मलिदा मिळत असल्याने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याची कायम चर्चा असते.
औद्योगिक क्षेत्राच्या भूखंडावर कोट्यवधी रुपयांचे कारखाने उभे केलेले आहे. या कारखान्यात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड असून, कामाला येताना जाताना कार व दुचाकीचा वापर ते करतात. मात्र, त्याची वाहने लावण्यासाठी कारखान्याची अधिकृत पार्किंग व्यवस्था अद्याप उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

अनेक वर्षांपासून कारखान्यासमोर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे शेकडो दुचाकीसह कार, कंपनी बस अशी वाहने लावली जातात. काही कारखान्यांकडून तर पार्किंगसाठी शेड ठोकण्याच्या तयारी सुरू असून, पांढरे पट्टे मारून पार्किंगचे फलक लावलेले आहेत. सुरक्षारक्षकांच्या देखरेखीत येथे बिनधास्त वाहने पार्किंग केले जातात. याकडे औद्योगिक विकास महामंडळाकडून दुर्लक्ष होत आहे.
एखादी घटना घडल्यास कारखान्यांच्या व्यवस्थापकाकडून सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान सांगितले जाते. परंतु कारखान्याकडून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कृत्याबद्दल ते बोलण्यास तयार नाही. सध्या ते स्वतःची पोळी भाजून घेत आहे.

सर्वसामान्य नागरिकांनी अतिक्रमण केल्यावर त्वरित कारवाईला समोर जावे लागते. कारखान्याकडून केलेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडून काणाडोळा केला जात आहे. औद्योगिक क्षेत्रात रासायनिक पदार्थांचे टँकर, अवजड वाहनांची प्रचंड रहदारी असते. कामावरून सुटल्यावर बेकायदेशीर पार्किंगमधून घोळक्याने वाहने रस्त्यावर निघतात. इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अपघाताच्या घटना घडतात. याबाबत काही बोलण्याचा प्रयत्न केल्यास सुरक्षारक्षक दादागिरी केली जाते. असा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे अनेक अधिकारी येथे काम करून बदलून गेलेले आहेत. मात्र, यापैकी एकाही अधिकार्‍याने बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्याचे धाडस केले नाही.

वनीकरणाच्या नावाखाली पार्किंग व्यवस्था
घर असो की दुकान, ते घेताना सर्वसामान्य नागरिक वाहन पार्किंग व्यवस्थेचा विचार करतो. मात्र, कुरकुंभ एमआयडीसीत कोट्यवधीच्या नामांकित कारखाने उभे केले आहे. परंतु त्यांची अधिकृत वाहन पार्किंग व्यवस्था केलेली नाही. समोरील जागेत झाडे लावण्याच्या नावाखाली थेट वाहने पार्किंग केले जात आहेत.

Back to top button