पुणे : खराडीतील भूखंडाला अखेर पालिकेने ठोकले सील | पुढारी

पुणे : खराडीतील भूखंडाला अखेर पालिकेने ठोकले सील

पुणे  : पुढारी वृत्तसेवा : 

महापालिकेच्या खराडीतील भूखंडावर ताबा मारण्याचा प्रयत्न करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाला अखेर प्रशासनाने दणका दिला आहे. या भूखंडाला पालिकेने थेट सील ठोकले असून, परवानगीशिवाय सील काढणार्‍यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. खराडी सर्व्हे नं. 53 व 54 येथे महापालिकेच्या मालकीचा 15 हजार 779 चौरस मीटर अ‍ॅमेनिटी स्पेसचा भूखंड आहे. त्यावर एक्झिबेशन सेंटरचे आरक्षण आहे. या भागातील आयटी कंपन्यांमुळे या भूखंडाची किंमत पाचशे कोटींच्या जवळपास आहे.

आरक्षणाच्या बदल्यात आरक्षणाचा भूखंड देऊन हा कोट्यवधीचा भूखंड बळकाविण्याचा प्रयत्न एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने चालविला आहे. यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच या व्यावसायिकाने हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
दै. ‘पुढारी’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर महापालिका प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. या भूखंडाला लोखंडी पत्र्याचे गेट लावून बांधकाम व्यावसायिकाने तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने व्यावसायिकाने लावलेल्या पत्र्याच्या गेटला मंगळवारी थेट सील ठोकून हा भूखंडच बंदिस्त करून टाकला. तसेच या ठिकाणी नोटीस लावण्यात आली असून, पालिकेच्या परवानगीशिवाय सील काढल्यास कारवाई करण्यात येईल, असा थेट इशाराही देण्यात आला.

 

Back to top button