पुणे : महाशक्ती करण्याची जबाबदारी विद्यापीठांची | पुढारी

पुणे : महाशक्ती करण्याची जबाबदारी विद्यापीठांची

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नव्या शिक्षण धोरणाच्या आधारे भारताला महाशक्ती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 122 व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

बैस म्हणाले, ’पदवी प्राप्त करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरूप आणि नवे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपली तयारी करावी लागेल. रोबोटीक्स, नॅनो कॉम्प्युटरसारख्या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासोबत अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा लागेल. अभ्यासक्रमात वेगाने परिवर्तन करीत विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी करणे गरजचे आहे. समकालीन गरजांनुसार अभ्यासक्रमात गतिमान बदल करून विद्यापीठाने आपले विद्यार्थी तयार केले पाहिजेत.’

पाटील म्हणाले, ’नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणातून मिळालेले श्रेयांक (क्रेडिट) आपल्या क्रेडिट बँकेत जमा व्हावेत आणि नंतरच्या शिक्षणासाठी ते उपयोगी ठरावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणावर न थांबता विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विविध क्षेत्रांत प्रावीण्य दाखवावे.’ डॉ. गोसावी यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रे आणि पदक देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा

पुणे : सहकाराला केंद्रातून बळ ! अधिकार्‍यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या दिल्याची ओरड

परराष्‍ट्र धोरण : मैत्री इजिप्तशी, लक्ष्य आफ्रिका

राजगुरू स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी देणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Back to top button