राजगुरू स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी देणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार | पुढारी

राजगुरू स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी देणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान देशप्रेमाचे, त्यागाचे प्रतीक आहे. हा देशभक्तीचा स्रोत प्रेरणादायी व्हावा, यासाठी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे राष्ट्रीय स्मारक दर्जेदार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. नियोजित स्मारकाचा आराखडा तयार झाला आहे. यासाठी जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्च होणार आहेत.
यातील पहिला टप्पा म्हणून दीडशे कोटी रुपये मंजूर केले जातील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजगुरुनगर येथे केली.

हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्या राजगुरू वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे. या कामाला अनेक वर्षे लागली आहेत. त्यावरून खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने नियोजित स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. हा आराखडा तयार झाला असून, त्यावर विचारविनिमय करण्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 1) विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, शांताराम भोसले, बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे, राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक सागर पाटोळे, अ‍ॅड. गणेश सांडभोर, सुशील मांजरे, अ‍ॅड. नीलेश आंधळे, कालिदास वाडेकर, सागर सातकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

बैठकी अगोदर वनमंत्री मुनगंटीवार यांनी राजगुरू वाड्यावर भेट देऊन झालेल्या व होणार्‍या कामांची माहिती घेतली. अधिकार्‍यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या. विशेष सभेत नियोजित आराखड्याची चित्रफीत, माहितीपट दाखवण्यात आला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, प्रिया पवार, सुशील मांजरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

हेही वाचा

पानशेत रस्त्यावरील सोनापूर पूल पुन्हा खचला

सातारा : दूध भेसळ करणार्‍या टोळीचा पदार्फाश; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

इंदापूर तालुक्यात शेतकर्‍यांची कृषिसेवा केंद्रांकडे पाठ

Back to top button