सीईटी सेलतर्फे 12 व्यावसायिक अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू | पुढारी

सीईटी सेलतर्फे 12 व्यावसायिक अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शनिवारी (दि. 24) तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या 12 अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर बीई-बीटेक प्रवेशाचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेले 3 अभ्यासक्रम बीई/बीटेक, एमई/एमटेक, बी.एचएमसीटी व कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेले 9 अभ्यासक्रम बी. एस्सी. (ऑनर्स), उद्यानविद्या, बी. एफ. एस्सी. मत्स्यविज्ञान, बी. एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी. टेक. जैवतंत्रज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्नतंत्रज्ञान, बी. एस्सी. (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा 12 अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन प्रणालीचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी मॉबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेबाबतची अधिक माहिती वेळोवेळी राज्य सीईटी कक्षाच्या www. mahacet. org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभियांत्रिकीच्या बीई, बीटेक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 24 जून ते 3 जुलै या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे 24 जून ते येत्या 4 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी सबमिट केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये नोंदणी शुल्क असून, आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क आहे. तर एनआरआय, पीआयओ कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी 5 हजार रुपये शुल्क आहे.

Back to top button