’क्रीम’ पोस्टिंगसाठी नवीन तरुण अधिकार्‍यांना घाई | पुढारी

’क्रीम’ पोस्टिंगसाठी नवीन तरुण अधिकार्‍यांना घाई

सीताराम लांडगे : 

लोणी काळभोर : धोरणात्मक व विकासात्मक बाबींसाठी आपले योगदान देऊन लोककल्याणाचे काम करावे, या हेतूने नागरी सेवेत आलेले तरुण अधिकार अगदी थोड्याच दिवसांत या ‘सिस्टिम’चा भाग बनून लवकरात लवकर ‘क्रीम पोस्टिंग’ कसे मिळेल याच्या नादाला लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यात सध्या प्रशासकीय बदल्यांचा हंगाम सुरू आहे. चांगल्या पोस्टिंगसाठी नवीन अधिकार्‍यांना सध्या घाई झाल्याचे दिसते. खास -ठरावीक जागेसाठीच त्यांचा अट्टहास सुरू आहे. या अट्टहासाने त्यांनी मनासारखी पोस्ट मिळविली. परंतु, अनेक बदल्यांना स्थगिती आल्याने पुन्हा त्यांच्या पोस्टिंगसाठी मुंबईवार्‍या सुरू आहेत. ‘मॅट’ च्या दणक्यानंतरही ‘हम नही सुधरेंगे’चा नारा त्यांचा सुरूच आहे.

युवक-युवतींनी शासकीय सेवेत येऊन धोरणात्मक व विकासात्मक बाबींसाठी आपले योगदान द्यावे या हेतूने दरवर्षी लाखो युवक-युवती लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपले नशीब आजमावून पाहतात. यापैकी फक्त 1 टक्के लोकांच्याही नशिबात या नोकर्‍या नसतात, जे यशस्वी होतात, त्यांचा उदो उदो होतो. मात्र, पुढे जाऊन हे यशस्वी परीक्षार्थी नेमके कसे काम करतात, याचे कोणतेही स्वतंत्र मूल्यमापन सध्या होताना दिसत नाही किंवा समाज ही तसे करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण ते ‘सिस्टीम’ चा भाग झालेले असतात आणि एकदा का या सिस्टमचा भाग झाले की नियमांचे पालन करावे असे बंधन त्यांच्यावर उरत नाही.

काही दिवसांपासून प्रशासकीय चौकटीत विविध विभागांच्या झालेल्या बदलांबाबत माहिती घेतली असता असे दिसून येते, की या नवीन तरुणांना ज्या पद्धतीने आयुष्यात कमी मेहनतीत कमी काळात यश मिळविण्याची घाई झालेली असते, तीच घाई ते यशस्वी होऊन ’सिस्टम’ मध्ये आल्यानंतर त्यांना शांत बसू देत नाही. थोडे दिवस इकडे तिकडे काम केल्यानंतर त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी, त्यांचे चिम्यागोम्या, अमुक अमुकचा उजवा-डावा हात अशा ‘सिस्टम’ बाहेर राहून ‘सिस्टम’ चालविणार्‍यांच्या मदतीने वरिष्ठ यंत्रणेवर दबाव आणून मलईदार पदांवर स्वतःची वर्णी लावण्याकरिताचे प्रयत्न या नवीन तरुण-तरुणी अधिकारी वर्गाकडून सर्रास होताना दिसत आहेत. विशेषतः कोकण विभाग व पुणे विभागामध्ये असे प्रकार नेहमी होताना दिसतात.

या अधिकार्‍यांच्या बदल्यांचा विषय येतो तेव्हा हे अधिकारी साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून या व्यवस्थेतील आपल्या सहकार्‍यांना इतरांमार्फत संदेश देऊन त्यांचे वर धाकदपटशा करून किंवा सत्ताधार्‍यांच्या आसपास असणार्‍या चिम्यागोम्यांमार्फत त्रास देऊन जागा खाली करण्यास सांगतात, तेव्हा अनेक प्रशासकीय नियमांची पायमल्ली होते हे सांगायला वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही.
विविध विभागांतील बदल्यांचा हंगाम सुरू असल्याने असे नवीन रुजू झालेले अधिकारी तरुण-तरुणी हे मिळेल त्याच्या मदतीने मिळेल त्या ठिकाणी त्यातल्या प्रशासकीय संरचनेचा कोणताही अभ्यास न करता कामाच्या स्वरूपाबाबत कोणतीही माहिती न घेता फक्त काही मध्यस्थांकडून मिळालेल्या माहितीवर अंधारात उडी मारण्याचे काम करत आहेत. ..

Back to top button