केलेली पेरणी वाया जाण्याची भीती ; चातकाप्रमाणे शेतकरी बघतोय पावसाची वाट | पुढारी

केलेली पेरणी वाया जाण्याची भीती ; चातकाप्रमाणे शेतकरी बघतोय पावसाची वाट

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  जून महिना सुरू झाला की शेतकर्‍यांना वेध लागतात ते पेरण्यांचे..चातकासारखी पावसाची वाट पाहत असणार्‍या शेतकर्‍यांनी मात्र पाऊस लांबल्याने पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त केली. जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. तत्पूर्वी शेतकरीवर्ग पेरणीपूर्व मशागत करण्याकडे भर देतो.अनेक शेतकर्‍यांनी नांगरट, काकरी पाळी करत पेरणीसाठी तयारी केली आहे. मात्र, पावसाने मात्र सर्वत्र पाठ फिरवली आहे. पाऊस लांबल्याने खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

याबाबत आमदाबादचे शेतकरी नितीन थोरात यांनी सांगितले की, शिरूर तालुक्यात खरीप पिके मोठ्या प्रमाणावर केली जातात, तसेच दूधधंदा मोठ्या प्रमाणावर आहे. पाऊस लांबल्याने जनावरांना चारा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. पाऊस लांबल्याने हा हंगामदेखील शेतकर्‍यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली असून, सर्व बाजारपेठांची आर्थिक नाडी ही शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यामुळे हा हंगाम वाया गेल्यास मोठा फटका शेतकर्‍यांसह बाजारपेठांना बसू शकतो, असे त्यांनी सांगितले.

याबाबत बाजार समितीचे माजी संचालक संतोष भंडारी यांनी सांगितले की, दरवर्षी पाऊस जून महिन्यात झाल्यानंतर मुगाची व नगदी पिकांची पेरणी केली जाते. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत मुगाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. अजून दहा दिवसांत पाऊस झाल्यास मुगाच्या पेरण्या होऊ शकतात. त्याचबरोबर मूग, हुलगा, तुरी, राजमा, काळा वाल, मटकी, चवळी या कडधान्य पिकांचीदेखील आवक शिरूर बाजार समितीत होऊन सरासरी 10 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असते. त्यामुळे कमी वेळेत शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळत असल्याने शेतकर्‍यांचादेखील याकडे मोठा कल असतो. मात्र, यासाठी वेळेत पाऊस होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगितले की, खरीप व नगदी पिकांची शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पेरणी होत असते. नगदी पिकांचे कमी दिवसात उत्पन्न मिळत असल्याने शिरूर बाजार समितीत ऑगस्ट महिन्यात आवक होऊन शेतकर्‍यांना चांगला लाभ होतो. बाजार समितीला उत्पन्न मिळते. पारनेर, श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यांतील शेतकरी येत असतात.अद्याप पेरण्या न झाल्याने संपूर्ण हंगाम धोक्यात आला असल्याचे ढोकले यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांत पावसाची नोंद नाही. पाऊस लांबल्याने पेरण्या झाल्या नाहीत. 30 जूनपर्यंत पाऊस झाल्यास पेरण्या होऊ शकतात. शेतकरी कडधान्ये व नगदी पिके घेऊ शकतात. पाबळ परिसरात 28 गावे व न्हावरा परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी उसाच्या लागणीदेखील होऊ शकल्या नाही. सध्या शिरूर तालुक्यात बी-बियाणे व खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे.
– सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, शिरूर.

पिण्याच्या पाण्याची अडचण नाही
सध्या घोड धरणातील जिवंत पाणीसाठा संपुष्टात आला असून, 30 जूनपर्यंत रांजणगाव एमआयडीसीसाठी 6.7 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा मंजूर असून, लागणारे पाणी 0.350 दलघमी आहे. घरगुती 15 जुलैपर्यंत रांजणगाव एमआयडीसी साठी 1.8 दलघमी मंजूर असून, 0.225 दशलक्ष घनमीटर इतके पाणी लागते. सध्या घोड धरणात मृतसाठा शिल्लक असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कुठलीही अडचण येणार नाही, असे घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एम. पी. ठनके यांनी सांगितले.

Back to top button