मानसिक रुग्णांसाठी आधारवड ’मानसरंग’ | पुढारी

मानसिक रुग्णांसाठी आधारवड ’मानसरंग’

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कौटुंबिक कलहामुळे रमेश यांना मानसिक आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारही सुरू आहेत. पण, त्यापलीकडे त्यांना मानसिक आधार देण्याचे काम मानसरंग गटातील प्रतिनिधी करीत असून गाणी, नाटक, मनोरंजक खेळ आणि गप्पांच्या माध्यमातून त्यांना सकारात्मक जीवनाकडे वळविण्याचे काम केले जात आहे. आज रमेश हे मानसिक आजारामुळे आलेले एकटेपण या गटात येऊन दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा गट कित्येकांसाठी आधारवड बनला आहे.

मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्याचे काम हा गट करीत आहे. परिवर्तन संस्थेच्या (सातारा) वतीने गेली सात वर्षे पुणे आणि सातारा येथे ‘मानसरंग’ गट चालविला जात आहे. मानसिक आजारामुळे आयुष्यात एकटेपण आलेल्यांना आधार देण्याचे काम या गटातून होत आहे. दर शुक्रवारी पुण्यात आणि शनिवारी सातारामध्ये गटाद्वारे कार्यशाळा घेण्यात येत असून, पुण्यात चालणार्‍या कार्यशाळेला सुमारे 45 जण येत आहेत. गटाच्या कार्यशाळेत येऊन लोक गप्पांच्या माध्यमातून एकमेकांचे प्रश्न समजून घेण्यासह त्यावर सकारात्मक चर्चाही करतात. त्याशिवाय गाणी, नाट्याभिनय आणि मनोरंजक खेळातून सकारात्मक जीवनशैली शोधण्याचा, एकटेपण घालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गटातील प्रतिनिधींनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना कलेतून मानसिक आजारावर मात करण्याचा मार्ग सापडला आहे.

Back to top button