जाहिरातीने तुटेल इतकी युती कच्ची नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

जाहिरातीने तुटेल इतकी युती कच्ची नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : एका जाहिरातीमुळे युती तुटेल, इतकी ती कच्ची नाही. भाजप-शिवसेना युती मजबूत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.16) थेरगाव येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राज्यभरात सर्वाधिक पसंतीचे असल्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावरून भाजपच्या पदाधिकार्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत टीका केली होती. त्यामुळे युती तुटते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, युती मजबूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युती पुढे जात आहे. चांगले काम केले जात असल्याने कोणी तरी सर्व्हे केला. त्यात पंतप्रधान मोदी यांना 84 टक्के पसंती दिली गेली आहे. ते जगात क्रमांक एकचे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. महाविकास आघाडीत राज्यात कंपन्या येण्यास घाबरत होत्या. युतीच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे परदेशी गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा क्रमांक एकवर आला आहे.

दरम्यान, व्यासपीठावर भाजपच्या आमदार व पदाधिकार्‍यांची संख्या मोठी होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा भाजप पक्षाच्या वतीने स्वतंत्र सत्कार केला. तसेच, भाजपचे आमदार अश्विनी जगताप व माजी आमदार बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून वेगवेगळी निवेदने देऊन चर्चा केली. त्या कृतीवरून युतीमध्ये आलबेल असल्याचे दिसून आले.

हेही वाचा

अहमदनगर : अनधिकृत पत्राशेड काढून टाका : आ. जगताप

पुणे : एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्‍याला मारहाण

गडहिंग्लज तालुक्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांची कारवाई

Back to top button