गडहिंग्लजला गांजाची शेती; पोलिसांकडून ७ लाखांचा गांजा जप्त | पुढारी

गडहिंग्लजला गांजाची शेती; पोलिसांकडून ७ लाखांचा गांजा जप्त

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ गावामध्ये गांजाची शेती केली असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. या माहितीवरून (शुक्रवार) सायंकाळी उशिरा पथकाने या ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून गांजाची शेती उध्वस्त केली.

हेब्बाळ (ता. गडहिंग्लज) येथे विष्णू सर्ज्याप्पा पिरापगोळ उर्फ कांबळे, काशाप्पा विष्णू पिरापगोळ उर्फ कांबळे या दोघांच्या मालकीच्या शेतजमिन गट क्र. ८३४ मध्ये ऊसाच्या पिकात गांज्याची ७५ झाडे लावण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे शुक्रवार दि. १६ रोजी रात्री धाड टाकून सात ते आठ फूट उंचीची ७५ झाडे पोलीसांनी जप्त केली. सर्वसाधारणपणे १०७ किलो वजन या गांज्याचे असून, त्यांची किंमत ७ लाख ५७ हजार इतकी आहे.

गडहिंग्लज तालुक्यामध्ये गांज्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणी पोलिसांच्याकडून अधूनमधून कारवाईही केली जात होती. मात्र आता थेट गांज्याची शेतीच गडहिंग्लजसारख्या ठिकाणी झाल्याने जिल्ह्याचे लक्ष गडहिंग्लजकडे लागले. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांज्याची लागवड केली असताना स्थानिक यंत्रणेला याची कल्पना आली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. कोल्हापूर पोलिसांच्या २० जणांच्या पथकाने ही कारवाई केली असून, गडहिंग्लज तालुक्यामध्ये गांज्यांची आणखी पाळेमुळे असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button