पिंपरी : उकसान पठार ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण | पुढारी

पिंपरी : उकसान पठार ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

कामशेत (पिंपरी ) : नाणे मावळमध्ये असणारे उकसान व पाले पठार येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. महिलांना रोज दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.
टँकरने पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ उकसान पठार, पाले पठार, आखाडेवस्ती जलजीवन मिशनअंतर्गत जवळजवळ 96 लाख रुपयांच्या निधीतून जे काम चालू आहे ते काम अतिशय संथ गतीने व निष्कृष्ट दर्जाचे आहे.

ज्या विहिरीतून पाणी होते ते पाणी ठेकेदाराने परस्पर उपसले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याला जवळजवळ दीड महिना झालेला आहे. ठेकेदाराकडून पाण्याचा टँकर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत, पंचायत समिती प्रशासन व पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनदेखील यावर काहीही तोडगा काढला जात नाही. विहिरीचे काम केले असून, ते सात ते आठ फूट आहे. विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. फक्त विहिरीला रिंग मारायची बाकी असल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले आहे.

विहिरीचे पाणी आटले

सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे विहिरीतील पाणीही आटून गेले आहे. विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणी काढणेही अवघड झाले आहे. त्यामुळे येथील वस्त्यांमधील लोकांना पाण्यासाठी रोज भटकंती करावी लागत आहे. येथील जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. उकसान पठारावरील आखाडेवस्ती व शेडगेवस्ती हे उकसान ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येते. या ग्रुप ग्रामपंचायतीत उकसान पठार हा भाग येतो.

हे ही वाचा : 

MP Shrikant Shinde : मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर

जाहिरातीमुळे शिवसेनेचं हसं झालं : अजित पवार

Back to top button