पुणे : मांडकी येथे रस्त्यासाठी हाणामारी ; महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे घडला प्रकार | पुढारी

पुणे : मांडकी येथे रस्त्यासाठी हाणामारी ; महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे घडला प्रकार

वाल्हे (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील धुळोबावस्तीतील लोकांना मांडकी गावात जाण्यासाठी मागील दोन वर्षांपासून रस्ता नाही. या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे यासाठी अर्जही केला होता. मात्र, त्यांच्या अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नाही किंवा त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत लोकांच्या सहमतीने रस्ता करण्याचा निर्णय घेतला. रस्ता करणे सुरूही झाले. पण, शेजारील शेतकर्‍याने हरकत घेतल्याने ग्रामस्थ आणि दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये काठी आणि हाताने मारहाण करण्यात आली.

याबाबत प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 12) धुळोबावस्ती येथील काही ग्रामस्थ या वस्तीवरील लोकांना मांडकी येथे ये-जा करण्यासाठी रस्ता बनविण्याचे काम करीत होते. मात्र, शेजारील मालकाने रस्ता माझ्या हद्दीतून जात आहे, माझी अजूनही जागा पलीकडे आहे, असे म्हणत हा रस्ता करण्यावर हरकत घेतली आणि यातूनच बाचाबाची होऊन नंतर हाणामारी झाली. यामध्ये काही लोकांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काठी आणि हाताने ग्रामस्थांना मारहाण करण्यात आली, तर दुसर्‍या गटाकडून आपल्यालाही मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, घटनास्थळी जाऊन वाल्हे व निरा पोलिस दूरक्षेत्रातील पोलिसांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही गट वाल्हे पोलिस दूरक्षेत्रात दाखल होत त्यांनी परस्परांविरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबतचा तपास जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलिस दूरक्षेत्रातील सहायक पोलिस उपनिरीक्षक केशव जगताप करीत आहेत.

Back to top button