पिंपरी : चेंबर देताहेत अपघाताला निमंत्रण ; जलनिःसारण विभागाच्या कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप | पुढारी

पिंपरी : चेंबर देताहेत अपघाताला निमंत्रण ; जलनिःसारण विभागाच्या कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप

भोसरी : भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली रस्त्याच्या मधोमध एक चेंबर आहे. चेंबरवरील झाकण ड्रेनेजमध्ये अडकले आहे. उड्डाण पुलाखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी पायी जाणारे परिसरातील नागरीक आणि दुचाकी वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे.

चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी
चारचाकी वाहनाचेही चाक या खड्ड्यांमध्ये अडकून नुकसान होऊ शकते. एकादी मोठ्या दुर्घटना घडण्याच्या आधी महापालिकेच्या जलनिःसारण विभागाने दुरवस्था झालेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.

वाहन चालविताना चालकांची कसरत
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखली स्मार्ट सिटीअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. परिसरातील घराघरांतील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा, यासाठी भुयारी गटार निर्मितीचे काम सुरू आहे; परंतु याठिकाणी रस्त्याच्या मधोमध धोकेदायक स्थितीत उघडे असलेले चेंबरमुळे धोका वाढला आहे. चेंबरचे झाकण अडकल्याने त्याठिकाणी खड्डा तयार झाला आहे. या चौकात वाहनाची मोठी वर्दळ असते.

त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेच्या जलनि:सारण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या खड्ड्यात पादचारी नागरिक आणि दुचाकीस्वार पडल्याच्या अनेक घटना घडल्याचे नागरिक सांगतात. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त प्रश्न नागरिक करू लागले आहेत.

Back to top button