वाल्हे परिसरात शेतकर्‍यांचे मान्सूनपूर्व पावसाकडे डोळे | पुढारी

वाल्हे परिसरात शेतकर्‍यांचे मान्सूनपूर्व पावसाकडे डोळे

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा तोंडावर आला असून, मृग नक्षत्र सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची उन्हाळी हंगाम आवरण्याची लगबग सुरू आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने त्यांची कामे खोळंबल्याने त्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत. मागील महिन्याभरापासून उन्हाचे चटके जाणवत असल्याने, शेतकर्‍यांनी सकाळी व सायंकाळी मशागतीची कामे करण्यावर भर दिला.

पावसाळा सुरू होण्यासाठी अगदीच काही दिवसच शिल्लक राहिल्याने मशागतीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. मार्च ते मे या चार महिन्यांत वाल्हे व परिसरात फक्त दोनदाच (13 व 28 एप्रिल) अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीची तयारी करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून दुपारनंतर दररोज आकाशात दाट ढग दाटून येत आहेत. मात्र, पाऊस पडत नाही. दरवर्षी मार्च ते मे हा अवकाळी पावसाचा काळ असतो. यामुळे शेतातील पिकांना फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. मात्र, मे महिन्यात येणार्‍या पावसाचा फायदा काही प्रमाणात खरीप पिकांच्या पूर्वमशागतीसाठी होतो. यंदा मात्र, वाल्हे व परिसरात वेगळी परिस्थिती दिसून आली.

यंदा मान्सूनपूर्व पाऊस न पडल्याने, वाल्हे गावाच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर आता पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे अनेक वाड्या-वस्त्यांवर टँकरची मागणी होत आहे. मान्सूनपूर्व पाऊस पडला नसल्याने, नांगरणीदरम्यान बाहेर पडलेले मातीचे मोठे ढेकूळ पाऊस न झाल्याने फुटले नाहीत. नांगरणी केलेली जमीन तापली असून, आता जोरदार पावसाची आवश्यकता आहे. परिणामी, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

मान्सून, परतीच्या पावसाचीही चिंता

मागील वर्षी मान्सूनपूर्व पाऊस वाल्हे व परिसरात कमी प्रमाणात पडला होता. तसेच मान्सूनचा पाऊस थोड्याच प्रमाणात पडला होता. मात्र, पावसाच्या परतीच्या प्रवासात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होऊन शेतकरीवर्गाचे मोठ्याप्रमाणत नुकसान झाले होते. यंदा मान्सूनपूर्व पाऊस न पडल्याने पुढेही मान्सूनचा व परतीचा पाऊस तरी मोठा पडेल की नाही, या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

Back to top button