पुणे : आकुर्डीतील तीव्र उताराचे रस्ते ठरताहेत अपघाताचे कारण | पुढारी

पुणे : आकुर्डीतील तीव्र उताराचे रस्ते ठरताहेत अपघाताचे कारण

आकुर्डी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आकुर्डी परिसरातील काही ठिकाणचे रस्ते तीव्र उताराचे आहेत. तीव्र उतारामुळे येथून जाणार्‍या दुचाकी अथवा चारचाकी वाहनचालकांचे नियंत्रण राहत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात या ठिकाणी तीन वर्षीय बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याने हे तीव्र उतार मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत.

म्हाळसाकांत चौकापासून खंडोबा मंदिराकडे जाणारा आकुर्डीचा मुख्य रस्ता तसेच विठ्ठल मंदिर ते भाजी मंडईकडे जाणारा रस्ता हा तीव्र उताराचा आहे. या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच परिसरात भाजी मंडई असल्याने मोठी गर्दी असते. उतारावरून आलेली वाहने येथून वेगाने नेली जातात.

अपघाताच्या घटनेत वाढ

अशावेळी वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत; तसेच येथून आकुर्डी मुख्य रस्त्याकडे जाताना वळण असल्याने रहदारीमुळे पुढील वाहन दिसून येत नाही. परिणामी अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक तसेच रॅम्बलर पट्ट्या माराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. या वरील ठिकाणी गतिरोधक उभारण्याची, त्यांची उंची वाढविण्याची तसेच रॅम्बलर स्ट्रीप तयार करण्याची मागणी केली जात आहे.

प्रशासन आणखी दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का?

येथील व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी संबंधित प्रभाग कार्यालयात यासंदर्भात काही महिन्यांपूवी निवेदन दिले होते. मात्र, याविषयी पालिकेच्या संबंधित विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने एका चिमुकल्याचा नाहक बळी गेला. त्यामुळे अशा तीव्र उतारांच्या रस्त्यांवर अपघाती घटना घडण्याची वाट पालिका प्रशासन पाहत आहे का, असा प्रश्न परिसरातील नागरिक तसेच व्यापारी उपस्थित करत आहेत.

तीव्र उताराचे रस्ते

1) मेन रोड आकुर्डी ते खंडोबा मंदिर
2) गंगानगर ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
3) विठ्ठल मंदिर ते भाजी मंडई
4) धर्मराज चौक ते गुरुद्वारा रोड
5) प्राधिकरण संत ज्ञानेश्वर उद्यान ते म्हाळसाकांत विद्यालयाकडे जाणारा रस्ता
6) धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर
7) भागुजी तुपे मार्ग ते आकुर्डी रेल्वे ब्रीज

नागरिकांच्या तक्रारीचे निवेदन आले आहे. वाहतूक शाखेची यासाठी परवानगी लागते. दर शंभर मीटरच्या अंतरावर गतिरोधक उभारण्याचे नियोजन आहे; तसेच काही ठिकाणच्या गतिरोधकांची उंची वाढविण्यात येईल.

                  – गिरीश कुटे, स्थापत्य अभियंता, अ प्रभाग

आकुर्डीतील मुख्य रस्त्यावर तसेच हनुमान मंदिराजवळ, मंडई परिसरातील रस्त्यांवर ठराविक अंतरावर गतिरोधक तसेच रॅम्बलर उभारण्यात यावेत, याविषयी मी निवेदन दिले आहे.

                            – नीलेश पांढरकर, माजी नगरसेवक

 

Back to top button