पुणे : उजनीतील जांभळ्या पाणकोंबड्यांची संख्या घटली | पुढारी

पुणे : उजनीतील जांभळ्या पाणकोंबड्यांची संख्या घटली

प्रवीण नगरे

पळसदेव(पुणे) : दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या प्रारंभी उजनी पाणलोट क्षेत्रातील विस्तृत हिरवळीवर मुबलकपणे वावरणार्‍या जांभळ्या पाणकोंबड्यांची संख्या या वर्षी घटल्याचे मत पक्षिअभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणी ओसरल्यावर पाण्याने आच्छादित जमीन उघडी पडते व त्या ठिकाणी हिरवळ तयार होते.

जोमाने वाढलेल्या गवतप्रदेशात नानाविध कीटक आपले जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात येतात. हे कीटक कित्येक पक्ष्यांना खाद्य म्हणून उपलब्ध होतात. या किटकांना मटकावण्यासाठी धरणापासून लांब असलेल्या इतर छोट्या-मोठ्या पाणवठ्यांवर वावरणा-या जांभळ्या पाणकोंबड्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात गर्दी करतात; परंतु वातावरणातील अनिश्चितता व अन्य प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदा या निळ्याशार मोहक जांभळ्या पाणकोंबड्यांची संख्या या वर्षी रोडावल्याचे चित्र दिसत आहे.

जांभळ्या पाणकोंबड्यांची वैशिष्ट्ये

या कोंबड्यांना निसर्गाने मनमोहक रंग बहाल केला आहे. या पाणकोंबड्यांना अतिशय गडद निळा, जांभळा व हिरवट रंग असतो. या सर्व रंगमिश्रणामुळे यांच्या अंगावरील पिसे मोरपंखी वाटतात. त्यांची चोच जाड व लालभडक असल्यामुळे लक्ष वेधून घेते. या कोंबड्यांचे पाय मजबूत असतात. गावठी कोंबड्यांसारख्या या कोंबड्या लांब ढांगा टाकत डुलत-डुलत चालतात. चालताना या कोंबड्यांची शेपटी सारखी वर-खाली हलत असते. शेपटीच्या या सवयीमुळे जेव्हा ही शेपटी वर होते, तेव्हा शेपटीखालचा पांढराशुभ— भाग रात्रीच्या वेळी लुकलुकणार्‍या तार्‍याप्रमाणे चमकतो.

भारतीय मूळ असलेले कुक्कुट गणातील हे पक्षी भारतात सर्वत्र आढळतात. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या पक्षिवैविध्येतील या दिमाखदार पाणकोंबड्यांची संख्या कमी होत चालली आहे. ही बाब पर्यावरणातील अन्नसाखळीत अडचण ठरणारी आहे. धरणाच्या पाण्यातून मुक्त झालेल्या जमिनीवरील गवताच्या हिरवळीवर मनसोक्त उदरनिर्वाह करत उजनीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या या पाणकोंबड्या हळूहळू अदृश्य होत आहेत ही चिंतेची बाब आहे.
                               डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

पाणकोंबड्या कमी होण्याचे कारण म्हणजे गुपचूपपणे त्यांची शिकार होत आहे. या पाणकोंबड्यांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे गुपचूपपणे होणार्‍या शिकारीकडे वनविभागाने तसेच पक्षिप्रेमींनी लक्ष देण्याची गरज आहे.

                                          विशाल बनसुडे, पक्षिमित्र, पळसदेव

Back to top button