खडकी : खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट | पुढारी

खडकी : खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

खडकी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या सुटीमुळे अनेक नागरिक आपल्या गावी किंवा परगावी जात आहेत. एस.टी. बस व रेल्वेला गर्दी होत असल्याने अनेक प्रवाशांना खासगी बससेवेवर अवलंबून राहावे लागते. मात्र, या संधीचा फायदा उठवित खासगी बस वाहतूकदारांनी तिकीट दरात मनमानी पद्धतीने वाढ केली आहे. यामुळे बस वाहतूकदारांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. उन्हाळ्याच्या सुटीत अनेकांचा आपल्या मूळगावी किंवा फिरण्यासाठी जाण्याचा बेत असतो.

मात्र, एसटी महामंडळाच्या बस आणि रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याने अनेकांना खासगी प्रवासी बसचा आधार घ्यावा लागतो. खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांचा ओघ बघून आपल्या तिकीट दरात मनमानी पद्धतीने वाढ करतात. सध्या प्रवाशांची संख्या वाढल्याने खासगी बस वाहतूकदारांनी तिकीट दरात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ केल्याचे प्रवाशांनी सांगितले.

खासगी प्रवासी बस वाहतूक कंपन्यांनी दर वाढविल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पुण्यावरून नागपूरला जाण्यासाठी रेल्वेचे भाडे 475 रुपये असून, एसटीचे भाडे एक हजार 615 रुपये आहे. मात्र, सध्या बस किंवा रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. यामुळे अनेक प्रवासी खासगी बसने नागपूरला जात आहे. मात्र, यासाठी प्रती सिट दोन हजार 200 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे.

खासगी बस वाहतूकदारांकडून उन्हाळ्याची सुटी, दिवाळीची सुटी, गणेशोत्सव, होळी, नाताळाची सुटी आदी गर्दीच्या हंगामात मनमानी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली जाते. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या वाहतूकदारांनी तिकीट विक्री व आरक्षण केंद्र अनेक ठिकाणी सुरू केली आहेत. तर काही कंपन्यांनी ऑनलाईन बुकिंगची देखील सोय केली आहे. मात्र, रेल्वे किंवा एस.टी. बसपेक्षा खासगी सेवेचे तिकीट दर जास्त असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

खासगी प्रवासी बस अनेक ठिकाणी प्रवाशी घेण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी रस्त्यावर थांबविल्या जात आहेत. यामुळे वर्दळीच्या वेळी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवाशांसाठी या वाहतूकदारांकडून सुविधा उपलब्ध केल्या जात नाही. मात्र, सुटीच्या हंगामात प्रवाशांना वेठीस धरून त्यांची आर्थिक लूट करणार्‍या खासगी प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

प्रवाशी वेठीस…

उन्हाळ्याच्या सुटीमुळे प्रवाशांची संख्या वाढली
एस. टी. बस व रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण
खासगी बसला प्रवाशांची गर्दी वाढली
तिकीट दरात केली दुपटीपेक्षा जास्त वाढ
खासगी कंपन्यांकडून प्रवासी वेठीस

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये खासगी प्रवासी बसच्या भाड्यामध्ये वाहतूकदारांनी मोठी वाढ केली आहे. हे तिकीट दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. या कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. प्रशासनाने तिकीट दरात वाढ करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करावी.

                                                    – सुरेश ससाणे, प्रवासी

Back to top button