पुणे : बलात्कार, खूनप्रकरणी जन्मठेप; सामूहिक अत्याचार करून मृतदेह ठेवला होता रेल्वे स्थानकात | पुढारी

पुणे : बलात्कार, खूनप्रकरणी जन्मठेप; सामूहिक अत्याचार करून मृतदेह ठेवला होता रेल्वे स्थानकात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वडाळा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा मृतदेह बॅगेत भरून तळेगाव रेल्वेस्थानकात ठेवणार्‍या तिघांना विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राहुल बराई, संतोष जुगदर, जिशान ऊर्फ ईशान हमज अली कुरेशी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. पीडितेच्या अंतर्वस्त्रात आढळून आलेल्या सिमकार्डच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना न्यायालयात हजर केले होते.

6 मे 2014 रोजी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास नालासोपारा परिसरात हा प्रकार घडला. बराई व कुरेशी यांनी पीडितेचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह लाल रंगाच्या प्रवासी ट्रॉली बॅगमध्ये ठेवून तो नालासोपारा येथील फनफिएस्टा चित्रपटगृह येथे नेला. त्यानंतर, तेथून एका कॅब टॅक्सीने मुंबई येथील सायन सर्कल येथे आणला. सायन सर्कल परिसरात हजर असलेल्या जुगदर यास तो मृतदेह दाखवून त्याच्या सांगण्यावरून एका टॅक्सीने दादर येथील पूल तसेच तेथून स्कॉर्पिओ गाडीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात उतरविला. त्यानंतर तेथून ती बॅग घेत रिक्षाने शिवाजीनगर येथून तळेगाव रेल्वे स्टेशन येथे जात येथील प्लॅटफॉर्म नं. 2 येथे ठेवून पसार झाले होते.

याप्रकरणी, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तपासानंतर आरोपींना अटक करून त्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात, विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी कामकाज पाहिले. त्यांनी 28 साक्षीदार तपासले. यामध्ये, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉ. विजय जाधव, नोडल ऑफिसर व आरोपी ज्या गाडीतून गेले त्या ड्रायव्हरची साक्ष महत्त्वाची ठरली. अपहरण व कट प्रकरणी पाच वर्षे, सामूहिक बलात्कारप्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप, खून प्रकरणात जन्मठेप, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 3 वर्षे, तर प्रत्येकी 25 हजारांचा दंड सुनावला आहे. आरोपींना सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत.

काटा काढण्यासाठी 75 हजारांची सुपारी

संतोष जुगदर याने पीडितेला फूस लावून पळवून आणत नालासोपारा येथील राहुल बरई व जिशान कुरेशी हे राहत असलेल्या सदनिकेमध्ये ठेवले. यादरम्यान, जुगदर याचे येणे-जाणे सुरू होते. पीडितेस जुगदर हा आर्थिक गैरव्यवहाराचे कट रचून गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात ती साहाय्य करत नाही तसेच तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांकडे करेल म्हणून तिच्या खुनाचा कट आखण्यात आला. तिचा काटा काढण्यासाठी जुगदर याने बरई व कुरेशी यांना 75 हजार रुपये दिले होते.

सिमकार्डमुळे गुन्हेगार गजाआड

मृतदेहाच्या पंचनाम्यादरम्यान तिच्या अंतर्वस्त्रामध्ये एक सिमकार्ड आढळून आले. त्याच्या तांत्रिक विश्लेषणातून संबंधित सिमकार्डवरून नालासोपारा येथील तिवारी नावाच्या व्यक्तीशी वारंवार संपर्क झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी नालासोपारा येथे जात तिवारीकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान, तिवारीने पीडितेचे छायाचित्र ओळखले. तसेच, आपणच पीडितेला कपडे व सिमकार्ड दिल्याची माहिती पोलिसांना दिली. कारण, आरोपींनी पीडितेचे सिमकार्ड नष्ट केले होते तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आपल्याला सांगितल्याचे तिवारी यांनी पोलिसांना सांगितले.

पन्नासहून अधिक पासबुक

आरोपींच्या नालासोपारा येथील घराच्या झडतीदरम्यान विविध बँकांची चाळीस ते पन्नासहून अधिक पासबुक तसेच एटीएम कार्ड पोलिसांना आढळून आले. याखेरीज, आरोपींनी ऑनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे फसवणुकीचे गुन्हे केल्याचेही समोर आले. त्यापैकी, संतोष जुगदर हा पोलिस असल्याचे सांगून गुन्हे करत होता. त्याविरोधात एका खुनाच्या गुन्ह्याचीही नोंद असल्याचे तपासात समोर आले होते.

Back to top button