पुणे : ‘जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा’ : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख | पुढारी

पुणे : ‘जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा’ : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे करावीत. संबंधित अधिकार्‍यांनी क्षेत्रीय पातळीवर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी करावी. मान्सूनच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोहिमेंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 1 हजार 224 पाणीपुरवठा योजना मंजूर असून, 1 हजार 136 योजनांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. 1 हजार 21 योजनांची कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत रस्ते आदी कामे सुरू असून, पाणीपुरवठा योजनांची कामे करताना या बाबीचाही विचार करावा. कामे करताना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करावा. कंत्राटदारांनी मेअखेर दिलेली कामे पूर्ण करावीत. याकरिता सर्व संबंधित अधिकार्‍यांनी आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

              – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Back to top button