पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदभरतीस मान्यता | पुढारी

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदभरतीस मान्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची उर्वरित पदे भरण्यास महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे महाविद्यालयातील 101 पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेकडून ट्रस्टच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल सुरू केले आहे. मागील वर्षी या महाविद्यालयामध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

ही पहिली बॅच आता दुसर्‍या वर्षात जाणार आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या उभारणीचे काम सुरू आहे. तूर्तास सोमवार पेठेतील कै. बाबूराव सणस शाळेमध्ये वर्ग भरविण्यात येत आहेत. दरम्यान, महाविद्यालय आणि हॉस्पिटलसाठी डीनपासून विविध वैद्यकीय तज्ज्ञ, लेक्चरर्स, ऑफिस स्टाफ व अन्य कर्मचारी भरती करण्यात आले आहेत. मात्र, ट्रस्टच्या आकृतिबंधाला मान्यता नसल्याने आणखी काही पदांची भरती रखडली होती. ट्रस्टने राज्य शासनाकडे आकृतिबंध मान्यतेसाठी पाठविला होता. याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे महाविद्यालया तील 101 पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Back to top button