पुरंदर उपसा सिंचनच्या पाण्यावर पिकविला ’सोनचाफा’ | पुढारी

पुरंदर उपसा सिंचनच्या पाण्यावर पिकविला ’सोनचाफा’

बेलसर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे दुष्काळी भाग आता सधन व बागायती होऊ लागला आहे. पारगाव मेमाणे गावच्या जामदारवस्तीतील रहिवासी हनुमंत बाळासाहेब मेमाणे यांनीदेखील सोनचाफ्याची शेती पिकवत मोठा नफा मिळविला आहे. दुष्काळी भागातही आधुनिक पद्धतीच्या माध्यमातून सोनचाफ्याचे मोठे उत्पन्न त्यांनी घेतले आहे.
जामदारवस्तीवरील हनुमंत मेमाणे यांनी पारंपरिक शेती करीत सोनचाफ्याची 120 झाडे लावली आहेत. या झाडांतून प्रतिवर्षी त्यांना खर्च वजा जाता 2 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहत आहे. गेल्या वर्षी मेमाणे यांनी कोल्हापूरच्या मलकापूर येथून सोनचाफ्याची झाडे खरेदी केली व त्यानंतर त्याची लागवड केली. लागवडीनंतर पहिली तोडणी 6 महिन्यांनंतर केली.

मेमाणे यांच्या शेतीमधून प्रतिदिवशी एक झाड 35 ते 40 फुले देते, तर एक झाड प्रतिवर्षाला 2 ते अडीच हजार फुले देते. झाडाचे वयोमान 30 ते 35 वर्षे असते. शेणखताचा मेमाणे यांनी वापर केला. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी शेततळे व विहिरीत साठवून बागेचे नियोजन केले, तर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब त्यांनी केला आहे. सणासुदीला सोनचाफ्याच्या फुलांची विशेष मागणी बाजारपेठेत असते. त्यानुसार मेमाणे गुलटेकडी (पुणे) येथील बाजारात फुलांची विक्री करतात. सध्या 10 रुपये ते 70 रुपये प्रतिपाकीट (एक पाकीट हे दहा फुलांचे) बाजारभाव मिळत आहे. सोनचाफ्याची तोडणी सूर्योदयापूर्वी करावी लागते. कळ्यांचीच काढणी करून त्या कळ्या एका प्लास्टिकच्या पाकिटात पॅक करून बाजारात पाठविल्या जातात. सोनचाफा शेतीसाठी विलास दुरकर (रा. गराडे) यांनी मार्गदर्शन केल्याचे मेमाणे यांनी नमूद केले.

युवकांनी आता पारंपरिक शेतीसोबतच सेंद्रिय व आधुनिक शेती करावी. नवनवीन प्रयोग व कमी उत्पादन खर्च करून अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करावा. कोणतीच गोष्ट शेतीत अशक्य नाही. सोनचाफ्यातूनही लहान व मोठे शेतकरी पैसा मिळवू शकतात.
                                                                           हनुमंत मेमाणे

Back to top button