सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी 18, 19 मे रोजी मुलाखती  | पुढारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी 18, 19 मे रोजी मुलाखती 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीला वेग आला असून, कुलगुरुपदासाठी अर्ज केलेल्या निवडक प्राध्यापकांच्या मुलाखती येत्या 18 आणि 19 मे रोजी आयआयटी मुंबईत होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या मुलाखतीचे निमंत्रण पडताळणीत पात्र ठरलेल्या इच्छुक प्राध्यापकांना पाठविले आहे. या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेत पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे वर्चस्व असल्याचे चित्र दिसून येत आहे.

माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे 18 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार डॉ. कारभारी काळे, तर प्र- कुलगुरुपदाचा कार्यभार डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे सोपविला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत देशभरातील विद्यापीठांमध्ये काम करणार्‍या 90 व्यक्तींचे अर्ज आले होते. त्यापैकी साधारण 20 व्यक्तींना मुलाखतीसाठी 18 आणि 19 मेदरम्यान आयआयटी मुंबईत निमंत्रित करण्यात आले आहे.

Back to top button