पुणे : कोरोना योद्ध्यांना न्याय देणार : आरोग्यमंत्री तानाजी सावंत | पुढारी

पुणे : कोरोना योद्ध्यांना न्याय देणार : आरोग्यमंत्री तानाजी सावंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांचे आरोग्य जपणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना आपण काय देतो, त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना वेतनवाढ व इतर लाभ दिल्यास शासनाच्या तिजोरीवर किती भार पडेल, असा प्रश्न करत आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा स्वयंसेविका आदींना न्याय देण्याचा प्रयत्न करणार, असे मत सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी सावंत बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपाचे आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे पुरोगामी, प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. रुग्णांना योग्य पद्धतीने आरोग्यसेवा देऊन त्यांचे समाधान केले पाहिजे. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडत असून, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपल्या मागण्या व अडीअडचणीबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्यसेवांचे बळकटीकरण करून नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘आशा स्वयंसेविका’ पुरस्कार अंतर्गत हवेली तालुक्यातील वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका मयूरी रवी पवार यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव प्राथ. आरोग्य केंद्राच्या शोभा सोनबा खेडकर यांना द्वितीय क्रमांक, पासली प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. वेल्हा) राणी बापू जोरकर यांना जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार तर तळेगाव ढमढेरे प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. शिरूर) आरती अमोल घुले यांना जिल्हास्तर प्रथम गट प्रवर्तक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच आशा स्वयंसेविकांना तालुकास्तरीय
प्रथम, द्वितीय पुरस्कारही वितरित करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सन्मान

सन 2022-23 आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली, ता. हवेली (प्रथम क्रमांक), प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडवगण फराटा, ता. शिरूर (द्वितीय क्रमांक), आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, केंदूर, ता. शिरूर (तृतीय क्रमांक) यांचा तसेच तालुकास्तरीय प्रथम व द्वितीय पुरस्कार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सन्मान करण्यात आला.

Back to top button