खेड बाजार समिती निवडणूक : आ. मोहिते पाटील यांच्या पॅनेलची बाजी | पुढारी

खेड बाजार समिती निवडणूक : आ. मोहिते पाटील यांच्या पॅनेलची बाजी

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या श्री भीमाशंकर सहकार पॅनेलला 11 जागा, तर सर्वपक्षीय पॅनेलला 7 जागा मिळाल्या. व्यापारी मतदारसंघाचे दोन उमेदवार पॅनेलविरहित लढले. मात्र, ते दोन्ही दोन बाजूंच्या मतप्रवाहाचे आहेत.

सर्वपक्षीय पॅनेलचे प्रमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, शिंदे शिवसेनेचे भगवान पोखरकर तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे बंधू विर्श्वास यांचा पराभव झाला. तर आ. दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत असलेले बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, विलास कातोरे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे यांनाही पराभव स्वीकारावा लागला.

बाजार समितीसाठी शुक्रवारी (दि. 28) मतदान झाले. संध्याकाळी तालुका क्रीडा संकुल येथे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांच्या अधिपत्याखाली मतमोजणी झाली. हमाल मापाडी गटातील सयाजी मोहिते यांचा पहिला निकाल बाहेर पडला.सयाजी मोहिते यांना 226 पैकी 201 अशी भरघोस मते मिळाली. प्रतिस्पर्धी केळकर यांना 22 मते मिळाली.

व्यापारी मतदारसंघातून माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांचे बंधू माणिक गोरे, तसेच महेंद्र गोरे निवडून आले. माणिक गोरे यांना 580, तर महेंद्र गोरे यांना 567 मते मिळाली. सोसायटी सर्वसाधारण गटात मोठी चुरस झाली. त्यात आमदार मोहिते पाटील (589), जयसिंग भोगाडे (812), विजय शिंदे (869), कैलास लिंभोरे (975), विनोद टोपे (748), सोमनाथ मुंगसे (639), तर अनुराग जैद 754 मते मिळवून विजयी झाले. महिला राखीवमधून कमल कड (960) आणि क्रांती सोमवंशी (600) या विजयी झाल्या. मात्र, तेथे पुनर्मतमोजणी अर्ज दाखल करण्यात आल्याने हा निकाल राखून ठेवण्यात आला होता.

ओबीसी प्रवर्गात हनुमंत कड विजयी झाले. कड यांना 942, तर त्यांचे प्रतिस्पर्धी योगेश पठारे यांना 300 मते मिळाली. अनुसूचित जमातीमधून विठ्ठल वनघरे यांचा विजय झाला. ग्रापंचायत गटातून सर्वसाधारणमधून सागर मुर्‍हे आणि रणजित गाडे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अशोक राक्षे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अनुसूचित जमातीमधून सुधीर भोमाळे विजयी झाले.

Back to top button