अजित पवारांच्या दौर्‍यापूर्वी निरेतील पाणी झाले शुद्ध | पुढारी

अजित पवारांच्या दौर्‍यापूर्वी निरेतील पाणी झाले शुद्ध

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी (दि. 24) होळ (ता. बारामती) येथील ढगाई मंदिर परिसर व निरा नदीची पाहणी केली. गत महिन्यात होळ येथील बंधार्‍याजवळ प्रदूषित पाण्यामुळे माशांचा खच पडला होता. पाण्यालाही दुर्गंधी येत होती. पवार यांच्या दौर्‍यापूर्वी येथील पाणी स्वच्छ झाले होते. मुरुमच्या बंधार्‍यातून पाणी सोडून ही तजवीज केली गेली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. जलसंपदा विभागाने मात्र यासंबंधी कानावर हात ठेवले असून बंधार्‍याची दरपे कोणी काढली असतील तर माहिती नाही, असे उत्तर देण्यात आले आहे.

होळ येथील निरा नदीतील मृत व भुललेल्या माशांचा विषय अगदी राज्यपातळीवर गाजला. दूषित पाण्यामुळे मासे मोठ्या प्रमाणावर भुलले होते. मृत माशांची संख्याही वाढली होती. परिणामी नदीकाठी गेले तरी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत होता, याबाबतचे वृत्त दै. ’पुढारी’ने प्रसिद्ध केले होते.

सोमवारी (दि. 24) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निरा नदीकिनारी असलेल्या ढगाई मंदिर परिसराची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकारी, ग्रामस्थांना बाजूला ठेवत ते नदीकडे गेले होते. या वेळी नदीतील पाणी चकाचक असल्याचे दिसून आले. पाण्याचा दूषितपणा पवार यांच्या दौर्‍यापूर्वी कमी कसा झाला, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुरुमच्या बंधार्‍यातून पाणी सोडून प्रवाह वाहता केला गेला, परिणामी पाण्याचा दूषितपणा कमी झाला असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पवार यांच्या दौर्‍यापूर्वीच ही तजवीज करून ठेवली गेली होती, परंतु यानिमित्ताने निरेच्या दूषित पाण्याचा प्रश्न बाजूला पडत असून संबंधित कारखाने, कंपन्यांनी याबाबत कायमची दक्षता घेण्याची गरज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Back to top button