महाळुंगे पडवळ : कांदा काढणीत अडथळे; शेतकरी हैराण | पुढारी

महाळुंगे पडवळ : कांदा काढणीत अडथळे; शेतकरी हैराण

महाळुंगे पडवळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वातावरणातील प्रचंड बदलामुळे कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हैराण झाला आहे. कधी प्रचंड उष्णता, अचानक येणारा अवकाळी पाऊस या अस्मानी संकटांमुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली आहे. काढणीला आलेला कांदा पावसामुळे भिजून निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या (डिंभे धरण) डावा कालव्याच्या लाभक्षेत्रांतर्गत येणार्‍या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रब्बी व उन्हाळी हंगामातील नगदी पीक कांदा याची लागवड केली आहे. यंदा बियाणे लागवडीसाठी मजुरीचा खर्च, महागाडी खते, औषधे यावर मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च झाला आहे.

दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक पिकवताना शेतकरी हतबल झाला होता. काढणीला आलेले कांदा पीक आता अवकाळी पाऊस आणि प्रचंड उष्णता यामुळे जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले तीन दिवस ढगाळ वातावरण, मधूनच येणार्‍या अवकाळी पावसाच्या सरी यामुळे कांदा काढणीत अडथळे येत आहेत. काढलेला कांदा भिजल्याने कांद्याची प्रत निकृष्ट होत आहे, त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

भाव नसल्याने साठवणुकीकडे कल

मंचर, ओतूर, जुन्नर, खेड आणि चाकण परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला बाजारभाव नाही. त्यामुळे सर्व कांदा साठवणीकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने बराकी केल्या जात आहेत. त्यासाठी बांबू, लाकूड, लोखंडी तार तसेच पाचट प्लॅस्टिक कागद आदिंचा वापर केला जात आहे. यासाठी पुन्हा खर्च करावा लागत आहे.

काढणीला परप्रांतीय मजूर

स्थानिक मजूर मिळत नसल्याने परराज्यातील मजुरांना एकरी 12 हजार ते 15 हजार रुपये देऊन कांदा काढणी आणि साठवणूक ही कामे केली जात आहेत. परिणामी, या वर्षाचे आर्थिक गणित कांदा पीक बिघडवणार असे चित्र सर्वत्र दिसत आहे.

Back to top button