Lok Sabha Exit Poll 2024 | उत्कंठा मतमोजणीची : प्रशासन सज्ज; उद्या दुपारी तीनपर्यंत पहिला निकाल हाती येणार

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या अंबड वेअर हाउसबाहेर तैनात असलेला खडा पहारा. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या अंबड वेअर हाउसबाहेर तैनात असलेला खडा पहारा. (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – बहुचर्चित नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. अंबड येथील गोदामात मंगळवारी (दि. ४) सकाळी ८ पासून दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रत्येकी ८४ टेबलांवर मतमोजणी पार पडणार आहे. दुपारी तीनपर्यंत दिंडोरी, तर सायंकाळी ६ पर्यंत नाशिकचा निकाल हाती येईल, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील जागा महायुती राखणार की महाविकास आघाडी परिवर्तन घडविणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात गेल्या महिन्याच्या २० तारखेला मतदान पार पडल्यानंतर अवघ्या जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होईल. दाेन्ही मतदारसंघांची मतमोजणी ही स्वतंत्रपणे पार पडणार आहे. नाशिकमध्ये ३०, तर दिंडोरीत २६ फेऱ्या पार पडतील. त्याकरिता प्रत्येकी ८४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. १४ टेबल मिळून एक विधानसभा मतदारसंघ याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघांचे एकूण ८४ टेबलवर ईव्हीएमद्वारे मतमोजणी पार पडणार आहे. तत्पूर्वी सर्वप्रथम टपाली पेटीतील मतपत्रिकांची मोजदाद केली जाईल.

जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी तब्बल एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गेल्या आठवड्यात संबंधित कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. दुसरे तथा अंतिम प्रशिक्षण हे सोमवारी (दि. ३) मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व कर्मचारी असे तिघे जण नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय टपाली मतमोजणीच्या टेबलवर स्वतंत्ररीत्या पर्यवेक्षक व सहायकाची नेमणूक केली गेली आहे. मतमोजणी पारदर्शक व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक वॉच ठेवून असणार आहेत. साधारणत: दुपारी बारापर्यंत काही फेऱ्यांचे निकाल हाती येणार आहे. या फैऱ्यांचा काैल कोणाच्या बाजूने असेल, तोच विजयाचा गुलाल उधळणार आहे.

मतमोजणीच्या फेऱ्या
नाशिक लाेकसभा

विधानसभा            मतदान केंद्र               फेऱ्या
सिन्नर                      ३२१                          २३
नाशिक पूर्व               ३२६                         २४
नाशिक मध्य             २९५                         २२
नाशिक पश्चिम           ४१०                         ३०
देवळाली                  २६९                         २०
इगतपुरी                   २८९                         २१

दिंडोरी लाेकसभा

  • विधानसभा मतदान केंद्र- फेऱ्या
  • नांदगाव-३३१-२४
  • कळवण-३४५-२५
  • चांदवड-२९६-२२
  • येवला-३२०-२३
  • निफाड-२७३-२०
  • दिंडोरी-३५७-२६

उमेदवार

  • नाशिक : ३१
  • दिंडोरी : १०

नाशिक पश्चिममुळे विलंब

नाशिक लाेकसभा मतदारसंघांतर्गत देवळालीच्या केवळ २० फेऱ्या पार पडणार आहेत. तर 'नाशिक पश्चिम'च्या सर्वाधिक ३० फेऱ्या होतील. त्यामुळे नाशिकचा निकाल हाती येण्यासाठी विलंब होईल. दरम्यान, दिंडोरी मतदारसंघातील निफाडमध्ये सर्वात कमी २० फेऱ्या असून, दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या २६ फेऱ्या पार पडतील.

हे पण महत्त्वाचे

  • नाशिकमध्ये ६०.७५ टक्के मतदान
  • दिंडोरीत ६६.७५ टक्के मतदानाची नोंद
  • एक हजार कर्मचारी करणार मतमोजणी
  • मोजणीवेळी ८४ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती
  • मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्हीची नजर
  • मतमोजणी केंद्रात मोबाइल नेण्यावर बंदी
  • मतमोजणी केंद्राभोवती असणार तगडा बंदोबस्त

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news