पिंपरीत 6 मे रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद ; मराठा आरक्षण समन्वय समितीतर्फे आयोजन | पुढारी

पिंपरीत 6 मे रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद ; मराठा आरक्षण समन्वय समितीतर्फे आयोजन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची पुणे, पिंपरी- चिंचवड येथे शनिवार, दि. 6 मे रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात येणार आहे. ही माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी दिली. आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे दि. 6 मे रोजी दुपारी बारा वाजता होणार्‍या या एल्गार परिषदेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने केली.

यात पन्नासपेक्षा जास्त युवकांनी बलिदान देऊन मिळवलेले मराठा आरक्षणास राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा अभ्यास न करता शासनाने दाखल केलेली पुनर्विचार याचिकादेखील फेटाळली गेली आहे. या प्रकारामुळे मराठा समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या एल्गार परिषदेमधून सरकारला आरक्षण मुद्द्यासंदर्भात अंतिम इशारा देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तत्काळ करावी. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या परिषदेत करण्यात येणार आहे.

Back to top button