दौंड शहरातील नवीन तिसर्‍या कुरकुंभ मोरीत गटाराचे पाणी | पुढारी

दौंड शहरातील नवीन तिसर्‍या कुरकुंभ मोरीत गटाराचे पाणी

दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरातील बहुचर्चित व वादग्रस्त असलेली तिसरी कुरकुंभ मोरी मागील चार महिन्यांपूर्वी कोणतेही उद्घाटन न करता आणि गाजावाजा न करता रेल्वे प्रशासनाने चालू केली. परंतु, ही मोरी पहिल्या दिवसापासूनच वादाच्या भोवर्‍यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ही मोरी अनेक बाजूने गळत आहे. जुन्या मोऱ्यांप्रमाणेच या मोरीत देखील गटाराचे सांडपाणी साचत आहे. त्यामुळे दौंडकर नागरिकांसाठी ’पुन्हा येरे माझ्या मागल्या’ अशी गत होऊन बसली आहे.

ही मोरी सुरू होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी या मोरीच्या कामाचे श्रेय घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर फलक लावून सर्व श्रेय आमचेच आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. तर, आमदार राहुल कुल यांनी कमी पडलेला निधी मिळवून दिला. त्यानंतर या मोरीचे उद्घाटन झाले. आत या मोरीत देखील गटाराचे पाणी साचत आहे.

या मोरीचे काम पूर्ण झाल्यावर दौंडकर नागरिकांना वाटले होते की, सकाळी त्यांना गटारीच्या घाण पाण्यातून जावे लागणार नाही. परंतु, दौंडकर यांच्या या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. आता या मोरीच्या निकृष्ट कामाबद्दल व दररोज साचलेल्या गटाराच्या पाण्याबद्दल चकार शब्द बोलायला कोणताही राजकीय पक्ष तयार नाही. ही मोरी पूर्णपणे तयार झाल्यावर अनेक राजकीय नेत्यांनी येथे फोटोसेशन केले होते. परंतु, ते सर्व आता मूग गिळून गप्प बसले आहेत.

Back to top button