पुण्यातील ससून रुग्णालयामधून नगरचा आरोपी पळाला | पुढारी

पुण्यातील ससून रुग्णालयामधून नगरचा आरोपी पळाला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपीने पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळू ऊर्फ चक्रधर रानबा गोडसे (वय 30, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. बाळूवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 19 एप्रिल रोजी त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना 22 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 26 मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. फिर्यादी प्रकाश मांडगे व संजय कोतकर हे कर्तव्यावर होते. दरम्यान, मांडगे हे आरोपीला डिस्चार्ज कधी मिळणार आहे? हे विचारण्यासाठी गेले होते; तर कोतकर हे वॉशरूमला गेले होते. त्या वेळी आरोपीने बेडीमधून हात काढून कर्मचार्‍यांची नजर चुकवून गर्दीचा व अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. मांगडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Back to top button