उजनीतील स्थलांतरीत पक्ष्यांना ‘टॅगिंग’ ; प्रवासमार्ग शोधण्याचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीचा उपक्रम | पुढारी

उजनीतील स्थलांतरीत पक्ष्यांना ‘टॅगिंग’ ; प्रवासमार्ग शोधण्याचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीचा उपक्रम

भरत मल्लाव :

भिगवण :  उजनी धरणावर येणार्‍या विविध जातींच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री (बीएनएचएस) या संस्थेच्या वतीने पक्ष्यांच्या मार्गाचा शोध सुरू झाला असून, आतापर्यंत 48 प्रजातीच्या एकूण 448 पक्ष्यांना टॅग करण्यात आले आहे. महाराष्ट्र वनविभागाने या प्रकल्पाला परवानगी दिली आहे.

उजनी धरण हे राज्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन समजले जाते. हिवाळ्यामध्ये हजारो पाणपक्षी देश व परदेशातून उजनीत डेरेदाखल होतात. मात्र, हे पक्षी कोठून येतात, त्यांचे जीवनमान कसे, त्यांच्या प्रवासाचा मार्ग काय याचे कोडे सर्वांनाच पडलेले असते यासाठी बाँबे नॅचरल हिस्ट्री संस्थेने पुढाकार घेतला आहे. यातूनच या स्थलांतर पक्ष्यांच्या मार्गांचा अभ्यास सुरू झाला आहे. यासाठी एक विशिष्ट क्रमांक असलेले धातूचे आणि प्लास्टिकचे कडे पक्ष्यांच्या पायात घातले जाते.

या प्रकल्पांतर्गत, उजनी येथे आजपर्यंत 48 प्रजातींचे एकूण 448 पक्ष्यांच्या पायात कडे घालण्यात आले आहे. यामध्ये मोठा रोहित, नदी सुरय, शेकाट्या, केंटिश प्लोव्हर व इतर पक्षी समाविष्ट आहे. अलीकडच्या वर्षात फोटोग्राफीच्या वाढीमुळे, टॅग केलेले पक्षी पाहणे सोपे झाले आहे. टॅग असलेला पक्षी जर कोणाला आढळून आला तर ‘बीएनएचएस’ला कळवावे, असे आवाहन करण्यात आहे.
महाराष्ट्रात अजून 5 ठिकाणी अशा प्रकारचा अभ्यास बाँब हिस्ट्रीच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये, जायकवाडी आणि नांदूर मधमेश्वर अभयारण्याचादेखील समावेश आहे, अशी माहिती ओमकार जोशी व दत्ता नगरे
यांनी दिली.

यापूर्वी प्रयोग झाला
पंधरा वर्षांपूर्वीही पुण्याचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी भादलवाडी येथील ग्रे हेरॉन व चित्रबलाक पक्षी व त्यांच्या पिल्लांना अशाच प्रकारे पायात टॅग बसवले होते. दै. ‘पुढारी’ ने भारतात चित्रबलाक पक्ष्यांचे सर्वांत मोठे सारणगंगार भादलवाडीत बि—टिशकालीन तलावात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यावरून त्यांच्या जीवनमानाच्या अभ्यासासाठी प्रथमच टॅग बसवण्यात आले होते. त्यानंतर आता दुसर्‍यांदा हा प्रयोग उजनीत होत आहे.

Back to top button