फिर्यादीनेच फाडले महापुरुषांचे बॅनर ; पाच जणांवर गुन्हा | पुढारी

फिर्यादीनेच फाडले महापुरुषांचे बॅनर ; पाच जणांवर गुन्हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले जयंतीनिमित लावलेला बॅनर फाडल्याप्रकरणी सहायक फौजदार भालचंद्र साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता; परंतु फिर्यादीनेच मित्रांच्या साथीने बॅनर फाडल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करत अटक केली. साळुंखे यांना या गुन्ह्यात
जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचेही तपासात पुढे आले.

पोलिसांनी याप्रकरणी आकाश साळवे, जयंत हिरवे, मोहन बनकर, संतोष हिरवे व मुकेश माने (सर्व रा. वडगाव निंबाळकर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे वडगावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आरोपी आकाश साळवे यानेच याबाबत पोलिस ठाण्यात सहायक फौजदार भालचंद्र साळुंखे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती.

साळुंखे यांनी मद्यपान करत दगड फेकत बॅनर फाडल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार साळुंखे यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. तणावपूर्ण स्थितीमुळे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तणाव नियंत्रणात आणला होता.

सहायक फौजदारावरच गुन्हा दाखल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर अधीक्षक आनंद भोईटे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास केला. तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजआधारे तपास केला असता त्यात या पाच जणांनी होळ चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेले बॅनर स्वतःच फाडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले, असे तपासात पुढे आले.

ही कामगिरी काळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक योगेश शेलार, शरद वेताळ, बाळासाहेब कारंडे, महेंद्र फणसे, सूर्यकांत कुलकर्णी, अनिल खेडकर, सागर चौधरी, हिरामण खोमणे, कुंडलिक कडवळे, हृदयनाथ देवकर आदींनी केली.

Back to top button